कोरोना लसीला मंजुरी ही अभिमानाची बाब; पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावरील सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसीला औषध नियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. कोरोनाविरोधातील लढाईचा हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशातच बनविलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान असायला हवा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपल्या वैज्ञानिक आणि संशोधकांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची शक्ती जगाला दाखवून दिली आहे. करुणा आणि महामारीपासून जनतेचे संरक्षण करण्याच्या भावनेतून वैज्ञानिकांनी हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाविरोधातील लढाईचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या लढाईला आता बळ मिळणार आहे. डीसीजीआयने सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी दिल्याने कोरोनामुक्त आणि तंदुरुस्त हिंदुस्थानचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. वैज्ञानिक आणि संशोधकांनी घेतलेल्या खडतर परिश्रमांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.