पराभवाचे खापर विरोधकांनी ईव्हीएमवर फोडायचे ठरवले!

सामना ऑनलाईन । झारखंड

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. एखादा विद्यार्थी परीक्षेत पेपर चांगला गेला नाही तर पेन नीट चालत नक्हता यासारखे कारण देतो त्याप्रमाणेच निवडणुकीतील पराभवाचे खापर विरोधकांनी ईव्हीएमवर फोडायचे ठरवलेय असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना लगावला.

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातच भाजप व मित्रपक्षांच्या विरोधात एकत्र आलेल्या महाभेसळ सहकाऱ्यांनी ईव्हीएमला दोष देण्यास सुरुवात केली आहे. या आधी माझ्यावर टीका करणाऱ्यांनी कालपासून निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत बोलायला सुरुवात केली आहे. यातून त्यांची पराभूत मानसिकता दिसून येत असली तरी ते आपला पराभव सहजासहजी मान्य करणार नाहीत असे मोदी म्हणाले.

श्रीलंकेत झालेल्या दहशतकादी हल्ल्याकडे लक्ष वेधत मोदी यांनी हिंदुस्थानातही यापूर्वी हेच सुरू होते. या चौकीदाराने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. आम्ही त्यांच्या दहशतवाद्यांना घरात घुसून मारले. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे नेते पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या वीर जवानांच्या शौर्यावर शंका घेत पुरावे मागत आहेत. यातून त्यांना या देशाचे जवान व देशाबद्दल असणारे प्रेम दिसून येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशात सत्ताबदल झाल्यावर जनतेला सुरक्षित वाटू लागले आहे. झारखंडमध्येही लोकांनी अनुभव घेतला असेल. ज्या ठिकाणी लोक सूर्यास्तानंतर बाहेर पडण्यास घाबरायचे तिथे आता परिस्थिती बदलत आहे. काँग्रेसला देशाची सेवा करण्यासाठी सरकार नको आहे. ते फक्त एका कुटुंबाचा विचार करत असल्याचे मोदी म्हणाले.