मोदी आणि जिनपिंग यांच्यामागे असलेला हा महाकाय खडक आहे रहस्यमय!

558

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच महाबलीपुरम येथे अनौपचारिक भेट घेतली. या भेटीचे फोटोही व्हायरल झाले. मोदी-जिनपिंग यांच्या भेटीच्या चर्चा जितक्या रंगल्या आहेत, तितक्या चर्चा या दोघांच्या फोटोत असलेल्या एका महाकाय रहस्यमय खडकावरूनही रंगल्या आहेत.

महाबलीपुरम इथे शोर मंदिराजवळ असलेला हा महाकाय खडक गेल्या अनेक वर्षांपासून एक भौगोलिक रहस्य बनून राहिला आहे. त्याच्याशी निगडित अनेक दंतकथाही प्रचलित झाल्या आहेत. कारण, गेल्या 1300 वर्षांपासून हा खडक कधीही पडेल, अशा भौमितिक स्थितीत आहे. 20 फूट उंच आणि 5 मीटर व्यासाचा हा खडक एका उतरत्या कड्यावर 45 अंश कोनावर आहे. अशा स्थितीत तो कधीही गडगडून पडून शकतो. पण, जवळपास 250 टन इतकं प्रचंड वजन असूनही त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. कारण गेली 1300 वर्षं हा खडक जैसे थे स्थितीत आहे.

हा दगड भूसंशोधकांसाठी एक रहस्य बनून राहिला आहे. खडकाच्या या स्थितीचा अंदाज वर्तवणारी अनेक गृहितकं त्यांनी मांडली, पण कुणालाही ठामपणे काहीही सांगता आलेलं नाही. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे काही भौगोलिक स्थित्यंतरांमुळे हा खडक निर्माण झाला. खडक पडेल या भीतीने अनेकांनी तो हटवण्याचे प्रयत्न केले. पहिला प्रयत्न इसवी सन 630 ते 668मध्ये झाला होता. दक्षिण हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या पल्लव राजवंशाच्या नरसिंह वर्मन याने हा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1908मध्ये मद्रासचे तत्कालीन गव्हर्नर आर्थर लावले यानेही सात हत्तींच्या मदतीने खडकाला तिथून हलवायचा प्रयत्न केला. तरीही तो हलला नाही.

स्थानिक भाषेत या खडकाचं नाव कृष्णाज बटर बॉल अशी आहे. याचा अर्थ होतो, श्रीकृष्णाच्या हातातला लोण्याचा गोळा. या खडकांशी जोडल्या गेलेल्या अनेक दंतकथांपैकी एक श्रीकृष्णाने चोरलेल्या लोण्याच्या गोळ्याची आहे. श्रीकृष्णाच्या हातातल्या लोण्याचा गोळा इथे पडला आणि सुकून खडक झाला, असंही मानलं जातं. गेल्या तेराशे वर्षं वेगवेगळ्या पद्धतीने हटवण्याचा प्रयत्न करूनही तो आजवर ना तिथून हलला किंवा तिथून कलंडून पडला. त्यामुळे हा खडक आजही एक रहस्य बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या