
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट शनिवारी मध्यरात्री काही वेळेसाठी हॅक केले गेले. हॅकर्सने 2 वाजून 14 मिनिटांनी त्यांचे अकाऊंट हॅक केले आणि सरकारने बिटकॉइनला मान्यता दिल्याचे ट्विट करीत सोबत लिंकही शेअर केली. 14 महिन्यांत दुसऱयांदा पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. ट्विटरने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
मोदींच्या ‘ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट’वर मध्यरात्री बिटकॉइनला मान्यता देण्यात आल्याचे ट्विट पाहून त्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पंतप्रधानांचे अकाऊंट काही वेळासाठी हॅक झाले असून या अकाऊंटवरून केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले. हा हॅकिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोदींच्या फॉलोअर्ससह ट्विटरची टीमही हादरून गेली. आम्ही सतत पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहोत. हॅकिंगची माहिती मिळताच आमच्या टीमने ‘कॉम्प्रोमाइज्ड’ अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. पंतप्रधानांव्यतिरिक्त अन्य कुणाचे अकाऊंट हॅक झाले नसल्याचे चौकशीत आढळले आहे, असे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदींचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यावेळी हॅकर्सने ट्विट करीत ‘पीएम केअर्स फंड’मध्ये बिटकॉइन दान करण्यास सांगितले होते.
बिटकॉइनला मान्यता दिल्याचे ट्विट
पंतप्रधानांच्या अकाऊंटवरून बिटकॉइनला मान्यता मिळाल्याची घोषणा केली होती. हिंदुस्थानने अखेर बिटकॉइनला ‘लिगल टेंडर’च्या रूपात स्वीकारले आहे. सरकारने अधिकृतरीत्या 500 बिटकॉइन खरेदी केले आहेत व ते देशाच्या सर्व नागरिकांना वाटले जात आहेत.’ असे ट्विट करीत सोबत लिंक दिली होती व त्यावर क्लिक करण्याचे सूचित केले होते. हे ट्विट डिलिट केले जाण्याआधी अनेकांनी ट्विटचा स्क्रीनशॉट काढून तो शेअर केला.
























































