पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात पूराने हाहा:कार, सहा हजाराहून अधिक लोकं विस्थापित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सध्या पूरामुळे हाहा:कार उडाला आहे. वाराणसीच्या वरुणा आणि गंगा नदीला पूर आल्याने किनाऱ्या लगतच्या शैलपुत्री आणि अमरपूर या भागातील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. घर दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.

दरम्यान गुडघाभर पाण्यातून एका वृद्ध महिलेची अंत्ययात्रा काढल्याचे फोटो देखील सोशल मिडिया वर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघाची ही अवस्था पाहून लोकांनी मोदींच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

उत्तर प्रदेशमधील अनेक भागात गेल्याकाही दिवसात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रयागराज जिथे कोट्यवधी रुपये खर्च करून महाकुंभचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रयागराजची परिस्थिती देखील अत्यंत भयंकर होती. अनेक भागात घरं पाण्याखाली गेली होती. छातीपर्यंतच्या पाण्यातून चालत जात लोकं आपला जीव वाचवत असल्याचे दिसत होते.

वाराणसीतही अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवळ विस्कळीत झाले होते. गंगा नदी देखील उफाळून वाहत असल्याने सर्व घाट परिसर पाण्याखाली गेला होता. जवळपास वाराणसीतील 84 घाटांना या पूराचा फटका बसला होता. तसेच सहा हजाराहून अधिक लोकं विस्थापित झाली होती.