डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाची 75 वर्ष पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तर मोदींनीही ट्विट करत ट्रम्प यांचे आभार मानले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर एक पोस्ट लिहिली आहे. यात ते म्हणतात, माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या. मोदी खूप चांगले काम करत असून रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभारी आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही ट्रम्प यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले. 75 व्या वाढदिवसानिमित्त मला फोन केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल माझ्या मित्रा, प्रे. ट्रम्प यांचे आभार. हिंदुस्थान आणि अमेरिकेतली व्यापक आणि जागतिक भागिदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी मी देखील वचनबद्ध आहे, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि हिंदुस्थानमध्ये तणावाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादत ट्रम्प यांनी हिंदुस्थानला झटका दिला. याचा परिणाम हिंदुस्थानमधील अनेक सेक्टरवर होत आहे. आगामी काळात यावरही तोडगा निघण्याची आशा आहे.

मोदींची आज पंच्याहत्तरी; खुर्चीवर कायम