
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ द्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. पंतप्रधानांनी कारगिल विजय दिनाचे स्मरण करत शौर्य गाजवणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना अभिवादन केले. आजचा दिवस देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी 21 वर्षांपूर्वी हिंदुस्थानी सैन्य दलाने कारगिलमध्ये विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झाले, ते आपण कधीही विसरू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच कोरोनाच्या जागतिक संकटात इतर देशांपैक्षा हिंदुस्थानची स्थिती चांगली असून देशातील रुग्ण बरे होण्याची रिकव्हरी रेट चांगली असल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी 1999 मध्ये हिंदुस्थानचे प्रयत्न सुरू असतानाच पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानने कपटी मनसुबे आखत आपल्या देशाच्या भूमीवर कब्जा करण्याच्या हेतूनने पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केले. त्यानंतर हिंदुस्थानी सैन्यदलाने असीम शौर्य गाजवत जगाला आपली ताकद दाखवून दिली. तसेच हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चांगला धडा शिकवला. उंच पहाडांवरून हल्ला करणारा शत्रू आणि त्यांच्याशी लढणारे हिंदुस्थानी लष्कर… अशा प्रतिकूल परिस्थितीतही हिंदुस्थानी जवानांनी शौर्य गाजवत ऑपरेशन विजय यशस्वी केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आता देशातही कोरोनासोबत आपले युद्ध सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करत आहोत. आरोग्य यंत्रणांच्या यशामुळे देशातील रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्युदरही कमी आहे. कोरोना सुरुवातीला जितका घातक होता, तेवढाच आजही धोकायदाक आहे. त्यामुळे काळजी घेणे हेच आपले शस्त्र आहे. त्यामुळे मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे. ज्यावेळी मास्क काढावा, असे वाटेल त्यावेळी कोरोना योद्धांचे स्मरण करा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे देशातील रुग्णांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे, मृत्युदरही कमी आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी दिलासा दिला. यावेळी देशाचा स्वातंत्र्यदिन कोरोना महामारीच्या संकटामध्ये होणार आहे. त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिनाला महामारीपासून स्वतंत्र होण्याची शपथ घ्यावी. आम्ही महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर होण्याचा संकल्प करा. काही नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा संकल्प करा, अशी शपथ घेण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
आपला देश आज ज्या उंचीवर आहे, तो अनेक महान नेत्यांच्या तपश्चर्येमुळे आहे. त्यातील एक असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची 1 ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक यांचे जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सगळ्या खूप काही शिकवते, असे मोदी म्हणाले. सकारात्मक दृष्टीकोनच आपल्याला कायम संकटातही संधी देईल. सध्याच्या करोनाच्या काळात देशातील तरुण-तरुणींनी टॅलेंड आणि स्कीलच्या जोरावर नवे प्रयोग सुरु केले आहेत. ईशान्येकडील राज्यात बांबू मोठ्या प्रमाणावर आढळतो. याच बांबूपासून त्रिपुरा, मणिपूर, असाममधील कुशल कारागीरांनी उच्च दर्जाची पाण्याची बाटली आणि जेवणाचे डब्बे विकसित केले आहेत. अशी विवध उदाहरणे देत मोदी यांनी जनतेला आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला.






















































