जीवनात ऍडव्हेंचर असायलाच हवे! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे युवकांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात काही ठिकाणी घनदाट जंगल, काही ठिकाणी अथांग समुद्र तर काही ठिकाणी वाळवंट पसरलेले आहे. देशातील ही भौगोलिक विविधता ऍडव्हेंचर स्पोर्टस्साठी उपयुक्त आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या आवडीनिवडीच्या ठिकाणांना भेट दिली पाहिजे. साहसी खेळ खेळले पाहिजेत. प्रत्येकाच्या जीवनात ऍडव्हेंचर असायलाच हवे, असे आवाहन युवकांना करत जो देश फिट राहील तोच जगात हिट राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 62 व्या भागात देशातील युवकांना ऍडव्हेंचर स्पोर्टस्मध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर देशातील ग्रामीण कारागीरांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केलेले हुनरहाट, अवकाश संशोधन, जैवविविधता आणि कॉप कन्व्हेंशन याच्यावर मोदी यांनी प्रकाश टाकला. देशाच्या जैवविविधतेमुळेच जगाच्या कानाकोपऱयातील पक्षी हिवाळय़ात हिंदुस्थानात येतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी मुरादाबादमधील दिव्यांग तरुण सलमान याचे कौतुक केले. सलमानने अपंगत्वावर मात करूत चप्पल आणि डिटर्जंट पावडर बनवण्याचा लघुउद्योग उभारला.

मुली पारंपरिक बंधने तोडत आहेत
ग्रामीण व्यावसायिक आणि कारागीरांसाठी आयोजित केलेल्या हुनरहाटमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलाच आहेत. त्या माध्यमातून तीन लाखांपेक्षा जास्त कारागीर, शिल्पकार यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हुनरहाटमध्ये कारागिरीबरोबरच खाण्यापिण्यातील विविधताही पाहायला मिळाली. हुनरहाटमध्ये लोकांच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत. या माध्यमातून मुली आता परंपरेची बंधने तोडत स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.