पंतप्रधान मोदी यांची आज नगरमध्ये विजय संकल्प सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  (दि. 12) नगरमध्ये ‘विजय संकल्प’ सभा होणार आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सभा होत असल्याने पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मोदींच्या सभेकडे जिह्याचे लक्ष लागले आहे. नगरमधील सावेडी उपनगर परिसरातील संत निरंकारी भवनाजवळील लोहार मळा येथे 21 एकरांच्या मैदानात सकाळी 9.30 वाजता ही सभा होणार आहे.

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पालकमंत्री राम शिंदे, विधानसभा उपसभापती विजयराव औटी, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार सुरजीतसिंह ठाकूर, प्रदेश सदस्य अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि भाजपचे शहराध्यक्ष दिलीप गांधी आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सध्या महायुतीने नगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांची सर्वांत मोठी सभा पुन्हा नगरमध्ये होणार आहे. त्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नगर दक्षिणची लढत प्रतिष्ठेची केल्यामुळे स्थानिक व राज्याच्या राजकारणावर मोदी काय बोलणार याची उत्सुकला शिगेला पोहचली आहे.