
सामना प्रतिनिधी । नांदेड
काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे बुडणारे टायटॅनिक आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत. टायटॅनिक बुडत असताना जसे काही लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते तशी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शरद पवारांचे उजवे हात असलेले प्रफुल्ल पटेल, शेजारच्या जिह्यातील खासदार हे मैदान सोडून पळून गेले आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेड येथील कौठा मैदानावर आयोजित प्रचंड जाहीर सभेत केला.
नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या मतदारसंघांतील शिवसेना, भाजपा, रासप आणि रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कौठा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, 2014च्या निवडणुकीनंतर काँग्रेसची स्थिती बुडत्या टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. या जहाजाप्रमाणे काँग्रेस दररोज थोडी थोडी बुडते आहे आणि तिच्यातील काहीजण जहाजाबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर राष्ट्रवादी पक्षासारखे काही लोक काँग्रेसबरोबर बुडत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, संपर्कप्रमुख आनंद जाधव, प्रताप पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, सुधाकर शृंगारे, खासदार संजय जाधव उपस्थित होते.
काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, देशाचा कणा असलेल्या मध्यमवर्गाला काँग्रेस शत्रू मानतो. मध्यमवर्गासाठी काँग्रेसने आतापर्यंत काही केलेले नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांचा रोष मतदानातून प्रकट होतो. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीतील पराभव समोर दिसताच त्यांनी केरळमधील वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. वायनाडमध्ये राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना रोड शोमध्ये काँग्रेसचा झेंडा शोधावा लागत होता इतक्या मागे काँग्रेसचा झेंडा होता. शिवाय तेथे डाव्यांविरुद्ध काही प्रचार करणार नसल्याची त्यांनी डाव्यांना खात्री दिली.
पाकिस्तानमधून पैसे घेऊन देशातील फुटीरतावाद्यांना मदत करणारे काँग्रेसला प्रिय आहेत, देशद्रोही घोषणा देणारे काँग्रेसला प्रिय आहेत. अशा काँग्रेसला मत देणे आपल्याला मंजूर आहे काय, असा प्रश्न त्यांनी श्रोत्यांना विचारला. श्रोत्यांनी ‘मंजूर नहीं’चा घोष केला. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकद 2014च्या निवडणुकीत तुम्ही दिलेल्या मतांमुळे मला मिळाली. आता 2019मधील निवडणुकीत तुम्ही द्याल त्या मताआधारे भ्रष्टाचाऱयांना त्यांच्या जागी (तुरुंगात) पोहचवणार. जम्मू आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, त्यांचे पिताश्री फारुख अब्दुल्ला हे दोन पंतप्रधान करण्याची भाषा करीत आहेत. तुम्हाला हे मान्य आहे का, असा सवाल मोदींनी केला त्यावर लोकांनी ‘नही’ असे उत्तर दिले. मोदी म्हणाले, पाकिस्तानने पुलवामा येथे केलेल्या हल्ल्याचा बदला आपल्या लष्कराने बालाघाट येथे घेतल्यानंतर काँग्रेसने कौतुक करण्याऐवजी संशय व्यक्त करून पुरावे मागितले. काँगेसने दहशतवादी, नक्षलवादी आणि फुटीरतावादी यांना नेहमीच समर्थन दिले आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना मोदी म्हणाले की, ज्या कायद्यामुळे आपण देशद्रोहींवर वचक बसवतो त्या देशद्रोहीविरोधी कायद्यालाच काँग्रेसचा विरोध आहे. यातील महत्त्वाची कलमे काढून हा कायदा निरुपद्रवी करण्याचा डाव काँग्रेसने जाहीरनाम्यात आखला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीच्या विरोधात जनमत इतके झपाटय़ाने वाढत आहे की, 2014मध्ये काँग्रेसचे 44 खासदार होते. यावेळी तेवढेही निवडून येतात की नाही याची खात्री नाही.
अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले की, सैनिकांच्या विधवा पत्नीसाठी असलेल्या आदर्श सोसायटीत भ्रष्टाचार करणाऱयांना जनता माफ करणार नाही आणि आदर्शसारखे घोटाळे होऊ नयेत यासाठीच आम्ही रेरा कायदा केला आहे. निवडणुकीत तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला दिलेले मत हे मला मिळणार आहे आणि त्या जोरावरच नवा हिंदुस्थान निर्माण करण्याची ताकद माझ्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने राज्याच्या विकासासाठी 13 हजार कोटींचा निधी दिला, तर 8 हजार 500 कोटींची कामे सध्या मराठवाडय़ात सुरू आहेत. मराठवाडय़ातील दुष्काळाच्या वेळी केंद्र सरकारने केलेली मदत मराठवाडा विसरू शकणार नाही. राहुल गांधीची भाषणे इतकी खोटारडी आहेत की काही दिवसांनी दूरचित्रवाणीवर मालिकेपूर्वी ज्याप्रमाणे मालिकेतील पात्रांचा किंवा त्यांच्या विचारांचा आमच्याशी काही सबंध नाही, आम्ही त्यास जबाबदार नाही अशी सूचना देतात तशीच सूचना राहुल गांधींच्या भाषणापूर्वी दिली जाईल. काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए महंमदचा जाहीरनामा आहे हेच कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
यावेळी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, रामदास आठवले, सुभाष साबणे, डॉ. माधवराव किन्हाळकर, ओमप्रकाश पोकर्णा यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रवीण साले यांनी केले.
नांदेडला डीलर नको, लीडर हवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यावर तुफानी हल्ला चढवला. सभेला उद्देशून ते म्हणाले, अशोक चव्हाण हे लीडर नाहीत तर ते डीलर आहेत. नांदेडमध्ये गॅसची डीलरशिप कुणाची? पेट्रोलपंपाची डीलरशिप कुणाची? दुचाकी गाडय़ांची डीलरशिप कुणाची? नांदेडकरांना आता डीलरची गरज नाही तर लीडरची गरज आहे व तो लीडर आम्ही दिला आहे. प्रताप पाटील-चिखलीकर आणि हेमंत पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
































































