
सामना ऑनलाईन । नगर
‘गरिबी हटाव’चा केवळ नारा देणाऱ्या काँग्रेसची नियत जनतेने ओळखली आहे. जनतेने काँग्रेसला हटविले तरच देशातील गरिबी हटेल, देश प्रगतीकडे वाटचाल करेल. देश भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांपासून मुक्त होईल’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दरम्यान, काँग्रेसच्या काळात अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाले, मात्र एनडीए सरकारने कठोर भूमिका घेतली. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली. काँग्रेस सरकार पाकिस्तानसमोर कमकुवत होते अशी टीकाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
शिवसेना-भाजप महायुतीचे नगर दक्षिणमधील उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरमधील ‘विजय संकल्प सभे’त पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय सुरू करणार
आम्ही पाच वर्षांत गोरगरीबांना पक्की घरे, वीज, गॅस, शौचालये उभी केली. जनेतेने आमच्यासारख्या इमानदार सरकारला मत दिल्यामुळे आम्ही ते काम करू शकलो. गावगावात रस्ते, नदीजोड आदी कामे पूर्णत्वाला नेणार आहोत, आता पुन्हा आमचे सरकार येणार आहे. 23 मेनंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत बदल करणार असून सर्व शेतकऱयांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
मोदींच्या सभेत काळ्या कपडय़ांवर बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कुणीही काळे झेंडे किंवा काळे कपडे घालून आपला विरोध दर्शवू नये म्हणून आज नगरमधील त्यांच्या सभेत काळ्या कपडय़ांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी नगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये अनेकांना त्यांनी घातलेल्या काळ्या रंगाच्या बनियन आणि सॉक्स काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आल्याचे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.



























































