
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हॅकरनं या अकाऊंटवरून पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून चक्क बिटकॉइन देण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळाने हे ट्विट डिलीट करण्यात आले. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
गुरुवारी पहाटे पंतप्रधान मोदी यांच्या नावाने असलेले ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर क्रिप्टो करन्सीसंदर्भातील ट्विट करत पीएम रिलिफ फंडाला मदत करा असे आवाहन करण्यात आले. त्यापाठोपाठ दुसरे एक ट्विट करण्यात आले, ज्यामध्ये हे अकाऊंट जॉन विकने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक नाही केला, असे म्हटले होते.
बिटकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइन ही एक व्हर्चुअल करेंसी आहे. म्हणजेच त्याचा व्यवहार फक्त ऑनलाइन होतो. हे दुसऱया चलनात रूपांतरितदेखील केले जाऊ शकते. हे 2009मध्ये चलनात आले. सध्या एका बिटकॉइनचा दर सुमारे 8,36,722 रुपये आहे.



























































