हिंदुस्थानने जगाला युद्ध नाही, बुद्ध दिला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांच्या 74 व्या महासभेतील सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला हिंदुस्थानी परंपरेची महती सांगितली. तसेच दहशतवादावरही कडाडून हल्ला चढवला. हिंदुस्थानने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिला आहे, असे ते म्हणाले. या महासभेत मोदी यांच्याआधी मॉरिशिअसचे राष्ट्रपती, इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती आणि लिसोथोच्या पंतप्रधानांनी संबोधित केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही महासभेला संबोधित करणार आहेत. महासभेचे हे सत्र 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात देशाची विकासची वाटचाल स्पष्ट करत दहशतवादाच्या धोक्याकडे जगाचे लक्ष वेधले.

आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांचाही उल्लेख केला. सव्वाशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानातील आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी जगाला शांतता आणि सोहार्दाचा संदेश दिला. आजही हिंदुस्थान हाच संदेश जगाला देत असल्याचे मोदी म्हणाले. जगाला युद्ध नाही तर बुद्ध देणारा आमचा देश आहे. त्यामुळे शांततेच्या आंदोलनात हिंदुस्थानचा मोठा वाटा आहे. दहशतवादाविरोधात हिंदुस्थान जगाला नेहमीच सतर्क करत आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली आहे. या उद्देशालाच दहशतवादाने नुकसान होत आहे. दहशतवाद कोणत्या एका देशात नाही. संपूर्ण जगभरात दहशतवाद पसरला आहे. मानवतेला असलेल्या आव्हानांपैकी ते एक आहे. त्यामुळे जागतिक शांतततेसाठी आणि मानवतेसाठी दहशतवादाविरोधात एकमत आणि एकजूटीने लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकत्र यायला हवे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थानात सर्वांत मोठे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. केवळ 5 वर्षांत 10 कोटींपेक्षा जास्त शौचालये उभारण्यात आली. आम्ही विकासासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचे रिणाम जगासमोर आहेत. मोठ्या प्रमाणात जनादेश मिळाल्याने मताधिक्याने आमचे सरकार सत्तेत आले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय बाळगून आमचे सरकार काम करत आहे. पर्यावरण रक्षणासाठी हिंदुस्थानात सिंगल यूज प्लॅस्टिकविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान चालवण्यात येत आहे.