कोरोनाचे आव्हान संपलेले नाही, राज्यांना सतर्क राहण्याची गरज;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे आव्हान अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. ओमायक्रोन आणि त्याचे सब- व्हेरिएंट्स कशा प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण करताहेत, याचा अंदाज आपल्याला युरोपीय देशांकडे पाहिल्यावर येतो. त्यामुळे आपल्याला सतर्क राहिलेच पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले.

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संसर्ग पुन्हा फैलावल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मागील दोन आठवडयांपासून काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. जगातील अनेक देशांपेक्षा हिंदुस्थानने कोरोनाविरुद्ध चांगला लढा दिला, हे खरे आहे. पण सध्या ज्याप्रकारे रुग्णवाढ होत आहे. त्यावरून आपल्याला सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते. आपण कोरोना काळात इतर देशांच्या तुलनेत चांगले व्यवस्थापन करूनही सध्या काही राज्यांत कोरोना रुग्ण वाढताहेत. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही हेच यातून स्पष्ट होते, असे पंतप्रधान मोदींनी आढावा बैठकीत नमूद केले.

मुलांच्या लसीकरणाला गती द्या; शाळांमध्ये विशेष मोहिमा राबवा

देशात 6 ते 12 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुलांची काळजी घेण्याची गरज आहे, मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यादृष्टीने लवकरात लवकर मुलांचे लसीकरण पूर्ण करा, त्यासाठी शाळांमध्ये विशेष लसीकरण मोहिमा राबवा, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी राज्यांना केल्या. शिक्षक आणि पालकांनीही याबाबत जागरुक राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

केरळमध्येही पुन्हा मास्कसक्ती

तिरुवनंतपूरम ः कोरोनाची रुग्णसंख्या झपाटयाने वाढू लागल्यामुळे केरळमध्येही पुन्हा मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांत मास्क न लावणाऱया लोकांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली दंड वसूल केला जाणार आहे. केरळ सरकारने बुधवारी याबाबत निर्णय घेतला. यापूर्वी दिल्ली, कर्नाटक व छत्तीसगढ या राज्यांमध्ये पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे.