पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’च्या थेट प्रक्षेपणाची शाळांना सक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नववी ते बारावीपर्यंतच्या निवडक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे शाळा, कॉलेजमधून थेट प्रक्षेपण दाखविण्याची सक्ती करण्यात येत आहे. दुर्गम भागात टीव्ही सिग्नल नसल्यास ऑल इंडिया रेडिओवरून हा कार्यक्रम ऐकविण्यात यावा शिवाय जर लाइट जात असल्यास जनरेटरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उद्या 29 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टोडियममध्ये पंतप्रधान नरेंद मोदी निवडक विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया या वाहिन्यांवरून संपूर्ण देशात करण्यात येणार आहे. तसेच लाईव्ह वेब स्ट्रिमिंगद्वारे www.pmindia.gov.in, mhrd.gov.in, mygov.in, doordarshan.gov.in या वेबसाइटबरोबरच मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यूटय़ूब चॅनेल, फेसबुक लाइव्ह व स्वयंप्रभा चॅनेलवर करण्यात येणार आहे.

दुपारी 2 पर्यंत अहवाल पाठवाच

कार्यक्रम संपल्यावर लगेचच म्हणजे दुपारी 2 वाजण्याच्या आत शाळांनीhttp://www.research.net/r/RMMNMDG या लिंकवर कार्यक्रमाचा अहवाल भरायचा आहे. सदर जिल्हा स्तरावरील अहवालाचे एकत्रीकरण करून राज्याचा एकत्रित अहवाल दुपारी 3 वाजण्याच्या आत पंतप्रधान कार्यालयास सादर करावयाचा असल्याने आपल्या जिह्याचा अहवाल वेळेवर भरला जाण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना डॉ.मगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अहवाल पाठविण्याची लिंक दुपारी 2 नंतर बंद होणार असल्याने एखाद्या जिह्याचा अहवाल पाठवला गेला नसल्यास दोषींवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपणच का पाहायचे?

कार्यक्रम सक्ती करण्यात आली तरी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तजवीज शिक्षण विभागाने करायला हवी. मोदींच्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रेक्षपण पाहण्याची सक्ती करण्याची गरज नाही. पंतप्रधानांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे अनेक मार्ग आहेत. व्हिडीओ, वर्तमानपत्र, इतर सोशल मीडियाद्वारे संदेश पोहोचवणे सहज शक्य आहे, असे हंसराज मोरारजी शाळेतील शिक्षण उदय नरे यांनी सांगितले.

  • शाळा, कॉलेजमध्ये कार्यक्रम सुरू असताना उत्तम दर्जाचे किमान पाच फोटो तसेच तीन मिनिटांची व्हिडीओ क्लिपही शिक्षकांनी तयार करायची आहे.
  • सदर फोटो आणि व्हिडीओ दुपारी 3 वाजेपर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवायचे आहेत.