पीएमसी बँकेतून आता 40 हजार रुपये काढता येणार

1735

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना आता आपल्या खात्यावरून 40 हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने सोमवारी पुन्हा पैसे काढण्याची मर्यादा 25 हजारांवरून 40 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे.

एचडीआयएल कंपनीला मोठय़ा प्रमाणात कर्ज वाटप केल्याने पीएमसी बँक अडचणीत आली आहे. त्याची दखल घेत आरबीआयने 23 सप्टेंबर रोजी बँकेवर निर्बंध आणत ठेवीदार, ग्राहकांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आरबीआयने दहा हजार रुपये, 25 हजार रुपये अशी दोन वेळा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली होती. तर आज तिसर्‍यांदा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे जवळपास 77 टक्के ग्राहकांना आपल्या खात्यावरील सर्व रक्कम काढता येणार आहे.

बँकेचे चेअरमन वारयम सिंगसह वाधवान पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे माजी चेअरमन वारयम सिंग, हाऊसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि.चे (एचडीआयएल) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग यांच्या पोलीस कोठडीत 16 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज दिले. बँकेतील 4 हजार 355 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी सिंग यांना 3 ऑक्टोबर रोजी तर वाधवान पिता-पुत्राला 5 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आल्यापासून हे तिघे पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. ती महानगर दंडाधिकारी एसपी शेख यांनी मान्य केली.

नो बेल, ओन्ली जेल

या आरोपींच्या रिमांड अर्जावरील सुनावणी न्यायालयात सुरू होती. त्यावेळी न्यायालयाबाहेर हजर असलेले हजारो खातेदार ‘नो बेल, ओन्ली जेल’ अशा आशयाचे फलक उंचावून या अधिकार्‍यांचा जोरदार निषेध करताना दिसत होते.

हा तर ‘व्हाइट कॉलर’ दहशतवाद

दरम्यान, बँकेची करोडो रुपयांची लूट करणार्‍या या तिघांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आमचे पैसे लवकरात लवकर परत करण्यात यावेत अशी मागणी करत हजारो खातेदारांनी आज दुपारी न्यायालयाबाहेर तीक्र आंदोलन केले. हा तर ‘व्हाइट कॉलर दहशतवाद’ आहे. त्यामळे आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी जोरदार मागणीही खातेदारांनी यावेळी केली. 

रवींद्र वायकर यांची हायकोर्टात याचिका

आरबीआयने घातलेल्या निर्बंधांमुळे पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील (पीएमसी) खातेदारांना आपल्या खात्यातून रक्कम काढण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे ग्राहकांना आपल्या खात्यातून जास्तीत जास्त रक्कम काढण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी करत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे खातेदारांना पैसे काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जोगेश्वरीतील अनेक खातेदारांनी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली. या खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा म्हणून आमदार वायकर यांच्या वतीने ऍड. तमसीन मोनिस यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या