
पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सोमवारी दोघा स्टॅच्युटरी ऑडिटर्सना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर आज बँकेच्या आणखी एका ऑडिटरला अटक करण्यात आली. अनिता किर्दत (35) असे अटक ऑडिटरचे नाव आहे.
बँकेचे आर्थिक व्यवहार वेळेत आणि योग्य पद्धतीने तपासण्याची जबाबदारी अनिता किर्दत यांच्यावर होती. त्या महिन्याला बँकेचे व्यवहार ऑडिट करीत होत्या. मात्र बँकेच्या व्यवहारामध्ये अनियमितता होत असताना त्यावर किर्दत यांनी आक्षेप घेतला नाही किंवा त्यांना तसे करता आले नाही असे समोर आले. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी आम्ही आज कार्यालयात बोलावले होते, परंतु त्या चौकशीला समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाही. त्यामुळे अनिता किर्दत यांना अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, बँकेचे स्टॅच्युटरी ऑडिटर जयेश संघानी आणि केतन लकडावाला या दोघांना घोटाळ्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली होती. पीएमसी घोटाळाप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.






















































