पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँक घोटाळा, वाधवान बंधूंच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर ईडीचा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकरणात अडकलेले एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांच्या अलिबागमधील आवास येथील फार्म हाऊसवर आज ईडीने छापा टाकला. करोडो रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक किमती वस्तू तसेच बंगल्याच्या आवारात कार आणि अन्य गाडय़ा आढळल्या. यापैकी एक कार कर्नाटकमधील असून दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत. तसेच ईडीच्या छाप्यात मालदीवमध्ये एक याट आणि एअरक्राफ्टही जप्त करण्यात आले आहे. मात्र या कारवाईबाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.

राकेश व सारंग वाधवान यांचे अलिबाग तालुक्यात आवास सासवणे या ठिकाणी फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये 22 खोल्यांचा आलिशान बंगला असून बंगल्याच्या परिसरात आलिशान कार, नौका अशी करोडोंची संपत्ती आहे. हा बंगला व आतील कार, नौका ही संपत्ती ईडीने जप्त केली असून स्वतःचे सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर आहेत. तर कर्नाटक पासिंगची कार ही हाऊसिंग डेव्हलपरच्या नावावर दिसत आहे. पीएमसी प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने आतापर्यंत दोन ठिकाणे शोधली आहेत. वाधवानच्या जवळचे सहकारी कोण होते, याचा शोध घेण्यात येत आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांना गुरुवारी पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित घोटय़ाळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने केलेली कारवाई ही गुप्त ठेवण्यात आली असून याबाबत जिल्हा व पोलीस प्रशासनालाही अंधारात ठेवण्यात आले आहे.