
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आज अटकेची तिसरी कारवाई केली. एचडीआयएलचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान या पितापुत्राला गुरुवारी अटक केल्यानंतर पोलिसांनी आज बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली.
बँक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जॉय थॉमस यांना पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर थॉमस यांना अटक करण्यात आली. गुरुवारीदेखील वाधवान पितापुत्रांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते, परंतु दोघांनी चौकशीत समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक केली होती. वाधवान पितापुत्राला आज कोर्टात हजर केले असता दोघांनाही 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ईडीची सहा ठिकाणी छापेमारी
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात आज आणखी मोठी कारवाई झाली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दाखल केलेल्या गुह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून आज मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील सहा ठिकाणी छापे मारले.
माझा बळीचा बकरा करतील! जॉय थॉमस यांनी व्यक्त केली होती भीती
पीएमसी बँकेचे भवितव्य अंधारात जाणार असल्याची कल्पना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना आधीच आली होती. आज त्यांना अटक झाली पण ‘माझा बळीचा बकरा करतील’ अशी भीती त्यांनी गुरुवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.
हाऊसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) कंपनीचे संचालक राकेश वाधवान यांनी पूर्वीचे कर्ज फेडले नसतानाही नवे कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱयांवर प्रचंड दबाव आणला होता आणि त्यामुळे बँक आर्थिकदृष्टय़ा डबघाईला येईल अशी पूर्ण कल्पना बँकेचे अध्यक्ष वरयम सिंग यांनाही होती अशी धक्कादायक माहिती थॉमस यांनी या मुलाखतीमध्ये दिली.
थॉमस यांनी या मुलाखतीत सांगितले की, पीएमसी बँकेत सुरू असलेल्या या गोंधळाबाबत आपण तपशीलवार पाच पानी पत्र लिहिले होते आणि ते पोलीस तसेच रिझर्व्ह बँकेला देण्याचा माझा विचार होता. भविष्यात या प्रकरणात आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न झाला तर ते पत्र पुरावा म्हणून उपयोगी पडणार होते, असे त्यांनी म्हटले आहे.
27 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन बँकेमध्ये घोटाळा झाला नसल्याचे मी सांगत होतो तेव्हा राकेश वाधवान यांची माणसे माझ्या अवतीभवती फिरून माझ्यावर दबाव आणत होती. पत्रकार परिषदेनंतर सारंग वाधवान यांनी मला फोन करून गंभीर परिणामांची धमकीही दिली होती, असा आरोप या मुलाखतीमध्ये थॉमस यांनी केला आहे.
राकेश वाधवान आणि वरयम सिंग हे दोघे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. रिझर्व्ह बँकेला लेखी जबाब देण्यासाठी जात असताना सिंग यांनी बरोबर येण्यास नकार दिला होता आणि ते पत्रकार परिषदेतही सहभागी झाले नव्हते, असे थॉमस यांनी या मुलाखतीत उघड केले आहे. एचडीआयएलची संपत्ती टप्प्याटप्प्याने विकून ठेवीदारांचे पैसे परत केले पाहिजेत आणि त्यांचा विश्वास कायम ठेवला पाहिजे, असे मतही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

























































