पैसे काढण्यासाठी पीएमसी बँकेत सभासद, ग्राहकांची गर्दी

31525

कष्टकर्‍यांची बँक असलेल्या पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. प्रत्येकजण मोठ्या विश्वासाने बँकेत पैसे भरत होता, गरजेनुसार काढत होता; पण आज रिझर्व्ह बँकेने तडकाफडकी एक आदेश काढला आणि बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मोबाईलवर एसएमएस आला आणि सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या चेहर्‍यावर चिंता, आक्रोश आणि हतबलतेचा भाव उमटला. आरबीआयने बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आणल्याने आता तुम्हाला केवळ एक हजार रुपये खात्यावरून काढता येतील अशा स्वरूपाचा तो एसएमएस पाहून पैसे काढण्यासाठी बँकेत मोठी गर्दी केली.

पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये गोंधळ,गरीब, मध्यमवर्गीयांची कोंडी होणार!!

 

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह या मल्टिस्टेट दर्जाच्या बँकेच्या महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात जवळपास 137 शाखा आहेत. सुमारे 17 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेली ही बँक आहे. आरबीआयने 35 ‘अ’ अंतर्गत बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे सभासद आणि ग्राहकांनी शीव, बोरिवली, भांडुपसह सर्वच शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. नेमकं काय झाल्याने आरबीआयने ही कारवाई केली, याबाबत कोणीच माहिती देत नसल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत का अशी चिंता प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होती. तसेच आपले हक्काचे पैसे मिळणार नसतील तर औषध-पाण्याचा खर्च कसा भागवायचा अशी हतबलता ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत होते.

पोलिसांचा बंदोबस्त

हक्काचे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी सर्वच शाखांमध्ये मोठी गर्दी केली होती. अनेक जण आरबीआय आणि बँकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच ठिकाणी बँकेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शनिवारी ठेवीदारांचा मेळावा

अचानक झालेल्या कारवाईमुळे पीएमसी बँकेच्या ठेवीदारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी मुंबईत ठेवीदारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला अर्थतज्ञ विश्वास उटगी मार्गदर्शन करणार आहेत. आता पुढे नेमके काय करायचे? संघटित होऊन लढा कसा उभारायचा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ठेवीदारांना या मेळाव्यातून मिळणार आहेत. राज्यभरात अशा प्रकारचे मेळावे घेण्यात येणार असून त्याची सुरुवात मुंबईतून करण्यात येणार असल्याचे उटगी यांनी सांगितले.

मुलीचं लग्न महिनाभरावर आल्याने सर्व पैसे पीएमसी बँकेत एकत्र जमा करून ठेवले होते, मात्र आता जर त्यापैकी फक्त एक हजार रुपये काढता येणार असतील तर उर्वरित पैसे आणायचे कुठून, कुणाकडे हात पसरायचा? – तेजिंदर सिंग, टॅक्सीचालक

अपंग असल्याने पीसीओ बुथ चालवून एक-एक पैसा जमा केला होता. पण आता तोच पैसा मिळणार नसेल तर माझा महिन्याचा आठ-दहा हजार रुपयांचा औषधांचा खर्च कुठून करणार, घर कसं चालवणार हा प्रश्न सकाळपासून डोळय़ासमोर उभा राहिला आहे. – मनोज तलवार, शीव (कोळीवाडा)

बँकेत पैसे आहेत, पण ते वेळेला मिळणार नसतील तर त्याचा उपयोग काय? स्वतःचे पैसे असूनही आता दुसर्‍याकडे हात पसरावे लागणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दोषींवर कडक कारवाई करावी, पण सामान्यांना वेठीस धरू नये. – अमित कामरा, शीव

उल्हासनगरात वृद्धा बेशुद्ध, नवी मुंबईत तोडफोड

पंजाब महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी बँक), रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याचे समजताच ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, वसई, खालापूर, अलिबागसह ठिकठिकाणी  बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांनी एकच गर्दी केली. नेमके काय घडले हे काहीच कळत नसल्याने खातेदारांमध्ये गोंधळ उडाला.  या गोंधळात उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथे धक्काबुक्की होऊन एक वृद्ध महिला बेशुद्ध पडली. यावेळी नोटाबंदीची आठवण ताजी झाल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. तर नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे खातेदारांच्या संतापाचा उद्रेक झाला. गर्दीने पीएमसी बँकेच्या शाखेवर दगडफेक करत काचा फोडल्या.  परिसरात तणाव पसरल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक शाखांबाहेर खातेदारांनी घोषणाबाजी देत ठिय्या दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या