पीएमपीएलची बस सेवा पुन्हा सुरू होणार, पालकमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’

724

लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या बससेवा सुरू करण्यास पालकमंत्री अजित पवार यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दर्शविला आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील सहा ते सात दिवसात सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले आहे. यामुळे लाॅकडाऊन नियमाच्या अधीन राहून शहरात लवकरच सेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची शुक्रवारी बैठक पार पडली. बैठकीत पीएमपीएल सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन पुकारण्यात आल्याने २५ मार्चपासून शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. मागील चार महिन्यांपासून शहरात केवळ अत्यावश्यक कारणासाठी बससेवा सुरू आहे. परिणामी पीएमपीएलला मोठा तोटा सहन करावा लागत असून, इतिहासातील नीचांकी उत्पन्न प्राप्त होत आहे. दरम्यान, लाॅकडाऊन नियमात शिथिलता दिल्यानंतर पुणे जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरू झाली. मात्र, पीएमपीएल सेवा बंदच होती. या पार्श्वभूमीवर पीएमपीएल अध्यक्ष जगताप यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार करून बससेवा सुरू करण्याची परवानगी मागितली होती. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यातच आता पालकमंत्र्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याने सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉकडाऊन नियमाच्या अधीन राहून सेवा सुरू करण्यास पालकमंत्र्यांनी संमती दर्शवली. शहरातील कुठल्या मार्गावर सेवा देणे शक्य आहे, याबाबतचे नियोजन पीएमपीएल प्रशासनाने करावे. यानंतर दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करून सेवा सुरू करण्याचा निर्णय होणार आहे.

पीएमपीएल सेवा सुरू करण्यास पालकमंत्र्यांनी तत्वतः परवानगी दिली आहे. यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करून कुठल्या मार्गावर सेवा सुरू करता येईल, याबातचे नियोजन पीएमपीएल प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
– राजेंद्र जगताप, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल

आपली प्रतिक्रिया द्या