मोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चिखल; पीएमपीएलच्या वाघोली स्टॅण्डची दुरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसामुळे पीएमपीएलच्या वाघोली बसस्टॅण्डची दुरवस्था झाली असून स्टॅण्ड परिसरातील खड्डे, त्यामध्ये साचलेले पाणी आणि चिखलातून मार्ग काढतच प्रवाशांना बसमध्ये ये – जा करावी लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असून त्यावर प्रशासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामूळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडाळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरात बससेवा पुरविली जाते. यासाठी महामंडळाचे दोन्ही शहरात 14 पेक्षा अधिक डेपो आहेत. वाघोली परिसरात नव्याने इलेक्ट्रीक डेपो उभारण्यात आला आहे. मात्र, डेपो अंतर्गत सुरू असलेल्या वाघोली स्टॅण्डची प्रचंड दुरावस्था झाली आहे. स्टॅण्ड सुरू करण्यात आल्यानंतर येथे केवळ मातीचे भराव टाकून जागा तयार करण्यात आली.

परिणामी मागील आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मातीच्या या भरावामध्ये मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना बसमध्ये ये – जा करण्यासाठी नाहक मनस्ताप करावा लागत आहे. अनकेदा पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने नागरिक त्यामध्ये पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

येथून पुणे महापालिका, स्टेशन, स्वारगेटसह आळंदी, लोणीकंद अशा ग्रामीण भागात गाड्या सोडण्यात येतात. त्यामूळे रोज स्टॅण्डवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, येथे आवश्यक त्या सोयी सुविधा नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने येथे प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध करून न दिल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

…प्रवासी संख्या, उत्पन्नावर परिणाम

पावसाळ्यापुर्वी स्टॅण्डची देखभाल दुरुस्ती न केल्याने शहर परिसरातील अनेक बसस्टॅण्डची अवस्था दयनीय झाली आहे. पत्र्याच्या शेडमधून पाणी गळणे, प्रमुख स्थानकावर शौचालय नसणे, खड्डे, चिखल यामुळे पुरती दुरावस्था झाली आहे. प्रशासनाकडून प्रवाशांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. दुसरीकडे मात्र प्रवासी संख्या, उत्पन्न वाढावे, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाते