कवी!

946

>> मिलिंद शिंदे

सागर वानखेडे. कवी. ही त्यांची पहिली ओळख. पण इच्छा आणि उर्मीच्या जोरावर चित्रपटसृष्टीतही पाय रोवले.

‘‘ह्यॉले जमते का लिहाले?’’

सागर वानखेडेंच्या वडिलांनी मला प्रश्न केला. त्या पित्याच्या नजरेत त्या प्रश्नाचं मळभ दाटलं होतं. त्यात एका पित्याची चिकित्सा होती, काळजी होती. आणि जमते का? च्याऐवजी ‘त्याले हे जमायला पायजे’ असंही डोळे ध्वनित करीत होते.

सागर वानखेडे याच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आमच्यात उभा ठाकलेला संवाद. फार ओळख नाही कविताकर्त्याशी, पण कार्यक्रमाला यायच्या आधी त्या संग्रहातल्या सगळय़ा कविता मी वाचल्या होत्या. भावल्याही होत्या. त्याचं वेगळेपण ठसठशीत होतं…. पण पित्याला करीयरच्या ऐरणीवर आश्वस्त करायचं कसं? पण त्यांच्या मुलाच्याच कवितेतील शब्दांनी मला धाडस दिलं. आणि मी होकार भरला. ‘आश्रू’ (पित्याचं नाव) यांच्या डोळय़ात डोह सजला… पिता खूश होताना मी पाहिला. प्रकाशन झालं. विषय संपला असं वाटलं, पण फोन खणाणला. पलीकडून सागर.

‘‘सर मी एक सिनेमा लिहिलाय… तुम्हाला काम करायचं आहे… वाचा, ऐका… कधी भेटू…’ इतकं फास्ट?

इथून आमच्यातल्या संवादाने आकार घेतला होता. सिनेमाचं नाव ‘बाजार’ (खरं तर ‘बजार’ विदर्भातला उच्चार). पुण्यामधल्या काही जिवलग मित्रांसोबत सागर वानखेडेंनी हा डाव बेतला होता. शूटिंग परभणीला… लांब मराठवाडय़ात. का? लोकशनचं कंपलशन? नाही. मग? निर्मात्याचा हट्ट. गावाला दाखवायचं असतं. अनेक अडीअडचणींनंतर शेवटी परिस्थितीला शरण जात सिनेमा पूर्ण न होताच त्या सिनेमाचं ‘पॅकअप’ झालं ते आजवर. सागर वानखेडे त्या सिनेमाचा दिग्दर्शक आणि लेखकही… पण प्रोजेक्ट सपशेल फसलं. माघारीचं निशाण फडकवत मराठवाडा सोडला.

कवीमनाचा सागर वानखेडे हार मानेल तो काय. पुन्हा जोमानं लिहू लागला आणि सगळा दाह, सगळी वेदना, भवतालाचं मनस्वी आकलन झरझर कागदावर आकार घेऊ लागलं. शब्द लाहय़ासारखे तडतडत बोलू लागले. रसिकांना भावू लागले आणि एक एक कविता वेदना बोलू लागली.

‘‘तिच्या वर्जीनीटीवर बोट ठेवत
ही छक्क्यांची बाजारपेठ जेव्हा तिला
ऑक्टोपसच्या विळख्यात ओढावं तसं
ओढून घेते…
तेव्हा तिनं मान्य केलेलं असतं
कॅक्टसच्या जंगलातलं जीणं’’
किंवा ही पुढची कविता
‘‘फासावर लटकलेला बळीराजा,
काळा पडेस्तोवर हाक देतोय’
आणि मला सर्वात भावलेली कविता
‘‘जीर्ण पानांवर रेखाटलेली अक्षरे
आमच्याच वेदनांचे ब्रॅण्ड अंबॅसेडर भासतात
आम्ही कागदावरच जन्म घेतो
मी रद्दी पेटवून दिलीय…’’

कविता सगळय़ा लिहिण्याचा घाट घालत नाहीय. पण शब्दांचं टोकदारपण लक्ष वेधून घेतंच. आणि असा माणूस मग म्हणतो मला सिनेमा दिग्दर्शित करायचाय. त्याचं सृजन त्याचं बलस्थान ठरतं. ठाशीव कोरून बाहेर येतं.

पण सोबत अर्धकुशल मित्रांचा विळखा. वाट कशी काढावी? सर्जनाला कसं जवळ घ्यावं? हा अडकित्ता कसा चुकवावा? ही ससेहोलपट होती… शेवटी ती कातर चुकवलीच आणि मुंबई गाठली. काही तसं औपचारिक शिक्षण नाही. पण मनात तीक्र इच्छा आणि लिहिण्याची आर्त उर्मी हाच ऐवज गाठीला. मग याच्याकडे संवाद लिही, त्याला मदत कर… सहाय्यक म्हणून काम कर. असा प्रवास सुरू झाला आणि या सगळय़ात हवी ती वाट सापडत नव्हती. मग कविता आणखी जवळ आल्या. त्या बोलू लागल्या. काम चालू होतं आणि एके दिवशी गणेश पाटील नावाचा माणूस सोबतीला आला. त्यांच्या मनात एक कल्पना रुंजी घालत होती. ती त्यांनी सागरला ऐकवली… त्या कथाकल्पनेनं जन्म घेतला ‘कॉपी’ या सिनेमाच्या माध्यमातून. कथा ऐकली आणि मला अचानक हेरंब कुलकर्णी यांचं ‘शाळा आहे शिक्षण नाही’ हे पुस्तक आठवलं. रमेश इंगळे-उत्रादकर यांची कादंबरी ‘निशाणी डावा अंगठा’ हे पुस्तक आठवलं… आणि शिक्षण व्यवस्थेवरच्या प्रश्नांना वाचा फोडणारं आणखी एक उजवं दस्त जन्म घेतंय असं वाटलं.

चित्रीकरण झालं. सिनेमा लवकर येईलच. पण बुलडाण्यावरून पुण्यात आलेला मुलगा, वडील संरक्षण खात्यात सेवेला. एक स्वप्न बघतो, कवितेतून बोलतो, शब्दांतून भवतालाची दाहकता मांडतो आणि एक सिनेमा घेऊन येतो, ‘कॉपी’ नावाचा…
स्नेहल वानखेडेंची साथ नसती तर कदाचित ना सागरला शब्द जवळ करता आले असते ना रूपेरी पडदा. स्नेहलची समर्थ, समजूतदार, सावलीसारखी साथ सागरला झेप घेण्याची उर्मी देते… मग सागर पुन्हा लिहितो, नवनव्या शब्दांशी खेळतो. त्यांना गोंजारतो. वाकवतो आणि मग ते शब्द सागरची भाषा बोलू लागतात.

आई ‘प्रभा’. सगळा प्रवास त्यांनी सिंहगड रोडवरच्या एका छोटेखानी फ्लॅटमध्ये केला. आपलं बैठं घर असावं, आपली बाग असावी, पाहुणे मंडळी आल्यावर त्यांची काळजी न वाटता आनंद व्हायला हवा. त्यांनी सागरकडे इच्छा व्यक्त केली. आपल्याला छोटा का होईना बंगला हवा, बैठा. आज पुण्यात सागरने नजरेत भरेल असा बंगला बांधलाय. सर्व सोयींनी युक्त. आधुनिक दृष्टिकोन असलेला. आपल्या छंदातून पैसा अर्जीत करून माता-पित्यांना बहाल करणं. आनंदच तो…

सागरला आणखीही खूप लिहायचंय, लिहायला हवं…

भवतालाला आपल्या शब्दांत पकडू पाहणारा आणि आपल्या मातापित्यांच्या नजरेत सुख शोधणाऱया या चित्रपटकार-कवीला शब्दांचा ‘सागर’ मिळो…

आपली प्रतिक्रिया द्या