प्रसिद्ध कवी-गीतकार गोपाल दास नीरज यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदीचे प्रसिद्ध कवी आणि गीतकार गोपाल दास नीरज यांचे गुरुवारी निधन झाले. बऱ्याच कालावधीपासून ते आजारी होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ होते. मंगळवारी त्यांना श्वास घेण्यात अडचण होत असल्या कारणाने आग्रा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

गोपाल दास नीरज यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी अनेक गीतं लिहिली आहेत. तसेच हिंदी साहित्यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ते प्रख्यात कवी देखील होते. त्यांचा जन्म ४ जानेवार, १९२४ ला उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील पुरावली गावामध्ये झाला होता.

‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘फिल्म फेयर’ पुरस्काराचे मानकरी
गोपाल दास नीरज यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २००७ मध्ये त्यांचा ‘पद्मभूषण’ने सन्मान करण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेश सरकारने त्यांना ‘यशभारती’ हा सन्मान दिला होता. तसेच ‘कारवां गुजर गया गुबार देखते रहे’ यासारख्या प्रसिद्ध गीतासाठी त्यांना ‘फिल्म फेयर’ पुरस्कार देण्यात आला होता. १९७०, १९७१ आणि १९७२ मध्ये त्यांना  ‘फिल्म फेयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीटद्वारे दु:ख व्यक्त करण्यात आले

‘पहचान’ या चित्रपटातील ‘बस यही अपराध मैं हर बार करता हूं’ आणि ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील ‘ए भाई! ज़रा देख के चलो’ या गीतांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. गोपाल दास नीरज यांचे एक डझनपेक्षाही अधिक कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

हिंदी चित्रपटासाठी लिहिलेले काही प्रसिद्ध गीतं – शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, लिखे जो खत तुझे, ऐ भाई.. जरा देखकर चलो, दिल आज शायर है, खिलते हैं गुल यहां, फूलों के रंग से, रंगीला रे! तेरे रंग में और आदमी हूं- आदमी से प्यार करता हूं यांचा समावेश आहे.