अन्वर नाल्यात घातक रसायन, धुळेवासीयांचे आरोग्य धोक्यात

375

मोहाडी उपनगरासह धुळे शहराच्या काही भागास पाणीपुरवठा करणाऱया डेडगाव तलावात येणाऱया अन्वर नाल्याच्या पात्रात घातक रसायनचा टँकर काही दिवसांपासून रिकामा केला जात आहे. त्यामुळे नाला पात्रातील पाणी दुषित झाले आहे. पाण्यातील रसायन घातक असल्याने नाला काठावरील झुडूपांनी माना टाकल्या आहेत. पाणी दुषित झाल्यामुळे नाला पात्रातील मासे आणि खेकडे मेलेल्या अवस्थेत आढळत आहेत. घातक रसायनाचे प्रमाण वाढले तर धुळेकरांना पिण्याचे पाणी पुरविणाऱया डेडरगाव तलावातील पाणी दूषित होईल आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱयांनी गांभीर्याने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धुळे शहराच्या दक्षिणेकडून धुळे शहराच्या दिशेने अन्वर नाला वाहतो. यंदा जूनपासून दमदार पाऊस होत असल्याने नाला प्रवाही झाला आहे. नाल्याच्या परिसरातील डोंगरांवरील ओघळीदेखील सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे नाल्यातून वाहणाऱया पाण्याची पातळी वाढली आहे. नाला खळखळून वाहत असल्याने नाल्याचे पात्र आणि परिसरातील भौगोलिक परिस्थितीत बदल झाला आहे. नाला वाहत असल्याने नाल्याच्या पात्रात लहान-मोठे मासे, खेडके आणि अन्य जलचर प्राण्याचा वावर वाढला आहे. शिवाय नाल्याच्या दोन्ही काठालगत निरनिराळ्या प्रकारची झाडी-झुडूपे वाढली आहेत.

जंगलात जाणाऱया अनेकांची तहान नाल्याचे पाणी भागवित असते. पण गेल्या काही दिवसांपासून नाल्याच्या रात्रीत घातक रसायन असलेला टँकर रिकामा केला जात आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी दुषित झाले आहे. पाण्यात रसायनाचे प्रमाण वाढल्यामुळे नालाकाठावरील झुडूपांनी माना टाकल्या आहेत. शिवाय नालापात्रात असलेले मासे आणि खेकडे मृतावस्थेत आढळू लागले आहेत. रसायन असलेले टँकर रोखले गेले नाही तर डेडरगाव तलावातील संपूर्ण पाणी दुषित होईल. हेच पाणी नागरिकांच्या पिण्यात आले तर सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होईल.

ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱयांकडे धाव

लळिंग, दिवाणमळा गावातील नागरिकांनी टँकर रोखण्याचा प्रयत्न केला आहे. पण, रात्री उशिराने टँकर नाल्यात रिकामे केले जात आहे. रसायन असलेला टँकर शहराजवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीतून येत असल्याचा संशय ग्रामस्थांचा आहे. जिल्हाधिकाऱयांनी याबाबत कारवाईचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा आबा कोळी या ग्रामस्थासह अन्य ग्रामस्थांची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या