
लातूर शहरातील मुख्यरस्त्यापासून जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चालवल्या जाणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली. 11 जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. सुमारे 3 लाख 32 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सदर धाडी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक राजाभाऊ बाबुराव घाडगे यांनी गुन्हा दाखल केला. मुख्यरस्त्यावरील घोड्याच्या तबेल्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळवला जात होता. 5 सप्टेंबरला या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी जुगार खेळताना सिध्दार्थ कवठेकर, ज्ञानोबा भिसे, प्रल्हाद पवार, विजयकुमार किनीकर, विशाला मुळे, बळीराम सुदावळे, बालाजी देवकते, धिरज शहाणे, मोहनदास वैष्णव, संतोष पोतदार, विजय पवार यांना पकडण्यात आले. रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली असा सुमारे 3 लाख 32 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील दुसऱ्या ठिकाणी रेणूका नगर भागामध्ये थेट रस्त्यावरील पथदिव्याच्या उजेडात तिर्रट जुगार खेळवण्यात येत होता. पोलिसांनी धाड टाकून 9 जणांना जुगार खेळताना पकडले असून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 52240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी युवराज रामगीर गिरी यांनी तक्रार दाखल केली. 7 सप्टेंबरला रेणूका नगर येथील रस्त्यावर पथदिव्याच्या उजेडात 9 जण गोलाकार बसून तिर्रट जुगार खेळत होते. त्यामध्ये सय्यद हारुन, अतूल माने, नागे वाघमोडे, निसार पठाण, अमोल सलगर, दिगंबर जाधव, बालाजी मादळे, शुभम नाकाडे, गोपाळ सोलंकर यांचा समावेश होता. त्यांच्याजवळील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा सुमारे 52240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































