मॅक्सी बहाद्दराचा रात्रीस खेळ चाले, चालण्याच्या स्टाइलवरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

1241

प्रत्येक गुन्हेगाराची चोरी करण्याची मोडस असते. तो त्याच मोडसचा वापर करून चोर्‍या करतो. पण गोरेगाव पोलिसांनी अशा चोरटय़ाला अटक केली, जो रात्रीच्या वेळेस चोर्‍या करण्यासाठी मॅक्सी घालत असे. त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी त्याला गजाआड केले. गणेश गुरव असे त्याचे नाव आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

गोरेगाव पश्चिम येथे मोतीलाल नगर आहे. गेल्या वर्षी मोतीलाल नगर येथे रात्रीच्या वेळेस चोर्‍या होण्याच्या घटना घडत होत्या. नेमका चोर कोण असेल हे स्पष्ट होत नव्हते. चोरटय़ाला पकडण्यासाठी पोलीस नाकाबंदी देखील लावत होते. मात्र चोरटा पकडला जात नव्हता. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्हीमध्ये एक महिला ही मॅक्सी आणि चेहर्‍याला ओढणी बांधून आत जात असल्याचे निदर्शनास आले. ती महिला मोतीलाल नगर येथून जाते. मात्र परत बाहेर येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. काही दिवसांपूर्वी पुन्हा मोतीलाल नगर येथे चोरीच्या घटना घडल्या.

पोलिसांनी पुन्हा त्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका फुटेजमध्ये त्या महिलेच्या चालण्याच्या स्टाईलवर पोलिसांनी फोकस केला. पोलिसांनी खबऱयांना कामाला लावले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. मोतीलाल नगर येथे राहणारा एक जण त्या पद्धतीने चालतो असे खबर्‍याने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी गणेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

म्हणून तो घालायचा मॅक्सी

पोलिसांनी पकडू नये म्हणून गणेश हा मॅक्सी घालायचा. चेहरा दिसू नये म्हणून तो ओढणी बांधत असायचा. मात्र त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याला पोलिसांनी अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या