दरोडा टाकणाऱ्या सराईतांना पाठलाग करून पकडले; कोथरूड पोलिसांची धाडसी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वार- सोमवार …वेळ मध्यरात्री 2 वाजून 20 मिनीटे…पोलीस कंट्रोल टू कोथरूड पोलीस स्टेशन… पंजरत्न सोसायटीत चोरटे शिरले आहेत… बीट मार्शल तत्काळ घटनास्थळी रवाना व्हायचे आहे…कोथरूड टू कंट्रोल… मॅसेज मिळाला… पोलीस रवाना झालेत…2 वाजून 25 मिनिटांनी पोलीस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी इमारतीतून खाली येत शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न… बीट मार्शलसह पोलीस अधिकाऱ्यांकडून दरोडेखोरांना पकडण्यासाठी धडपड…अखेर एका चोरट्याला धक्का देत खाली पाडून ताब्यात घेतले…दुसऱ्या चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करून कोथरूड पोलिसांनी सराईत शिकलगिरीकर टोळीतील सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बल्लूसिंग प्रभूसिंग टाक आणि उजालासिंग प्रभूसिग टाक (दोघेही रा. रामटेकडी अंधशाळेच्यामागे, वानवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे.

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचरत्न सोसायटीत चोरटे शिरल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला रहिवाशांनी दिली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने कोथरूड पोलिसांना माहिती देत घटनास्थळी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके आणि बीट मार्शलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आल्याची चाहूल लागताच दरोडा टाकणाऱ्या सराईतांनी बिल्डींगमधून खाली उतरून पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर हत्याराने हल्ला केला. जिवावर उदार होऊन घातक धारदार हत्यारानिशी असणाऱ्या बल्लूसिंगला पोलिसांनी धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर दुसऱ्या आरोपी उजालासिंगसह साथीदारांना पळ काढला. मात्र, कोथरूड पोलिसांनी एक किलोमीटरपर्यंत सराईताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी आवश्यक कटावण्या, लहान मोठया वेगवेगळया धारदार सुऱ्या, कटर, गाडी असा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपी बल्लूसिंग याच्याविरूध्द 63 गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार उजालासिंग याच्याविरूध्द 72 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, एसीपी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, वैभव शिंदे, मनोहर कुंभार, सूरज सपकाळ, नंदकिशोर सांगुर्डे, होनाजी धादवड, विकास मरगळे, दत्ता चव्हाण, स्वप्निल गायकवाड, गणेश बाठे यांनी केली.

चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग
चोरट्याला पकडल्यानंतर इतर चोरटे वेगवेगळ्या दिशेने पळाले. त्यापैकी एका चोरट्याचा पोलीस शिपाई वैभव शिंदे यांनी पाठलाग केला. तो पंचरत्न सोसायटीतून पौड रस्त्यावर आला. त्या ठिकाणाहून तो रस्त्याच्या पडीकडे असलेल्या अजेंठा सोसायटीत घुसला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या मदतीला मोबाईल व्हॅनमधील मनोहर कुंभार, नंदकिशोर सांगुर्डे आले. अजेंठा सोसायटीच्या संरक्षक भिंती असल्यामुळे त्याला बाहेर पडता येणार नाही हे पोलिसांना समजले. त्यावेळी पोलिसांच्या मदतीला सोसायट्यांचे सुरक्षारक्षक आले. आरोपीला अजेंठा सोसायटीच्या संरक्षक भिंतीजवळ पकडले.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीतील दोघांना कोथरूड पोलिसांनी धाडसाने पकडले आहे. अवघ्या पाच मिनीटात घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर