
हैदराबाद पोलिसांनी एका पाकीटमाराला अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चोर अलिशान आयुष्य जगत होता. तो एका भाड्याच्या घरात राहत होता आणि महिन्याला 30 हजार रुपये भाडे भरायचा.इतकेच नव्हे तर आपल्या मुलांना त्याने महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातले होते. या पाकीटमाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कुश्वा सिंह ठाणेदार हा 2004 पासून रेल्वे प्रवाशांचे पाकीट मारत आहे. तो हैदराबादचा रहिवासी असून त्याने चोर्या मार्या करून खूप संपत्ती गोळा केली आहे. त्याच्या घराचे भाडेच 30 हजार रुपये इतके आहे. तसेच त्याची दोन मुलेही मोठ्या इंग्रजी शाळेत शिकत आहे. कुश्वा रेल्वे प्रवाशांकडून त्यांचा मुद्देमाल चोरत असे. कुश्वा लांब पल्ल्याच्या गाड्यातील प्रवाशांना लक्ष्य करत असे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणाअत रोख रक्कम, दागिने हिसकावयचा. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडे 13 लाख रुपये रोख रक्कम आणि 54 लाख किंमतीचे 67 तोळे दागिने असा ऐवज मिळाला. आतापर्यंत त्याने दोन कोटी रुपयांची संपत्ती चोरल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुश्वा महिन्यातून आठवेळा अशा चोर्या करायचा. एका चोरीच्या मागे किमान 20 हजार रुपये मिळतील असे त्याचे लक्ष्य असायचे. कुश्वाचा 400 गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



























































