डोंबिवलीत ट्रॅफिककोंडी करणाऱ्या पोलीस चौकीची ‘उचलबांगडी’; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवली पश्चिमेतील ताश्कंद दुकानाजवळ उभी असलेली आणि ट्रॅफिककोंडी करून वाहनचालकांचा जीव मेटाकुटीला आणणाऱ्या पोलीस चौकीची अखेर वाहतूक विभागानेच ‘उचलबांगडी’ केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे ही चौकी द्वारका हॉटेलजवळील पुलाखाली नव्या जागी बसवण्यात आल्याने परिसरातील ट्रॅफिककोंडी फुटल्याने आसपासचे रहिवासी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिमेकडील ताश्कंद दुकानाजवळ वाहतूक विभागाची पोलीस चौकी उभारण्यात आली होती. या चौकीमुळे वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्याचे साईडइफेक्ट स्टेशन परिसरात होऊन तिथेही मोठी वाहतूककोंडी होत होती. त्यातच चौकीच्या मागील बाजूस कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होऊन दुकानदार आणि रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. या चौकीमुळे वाहनांना दहा ते पंधरा फुटांचा वळसा घालून जावे लागत होते. काही रिक्षाचालकांनी येथे बेकायदा रिक्षा स्टॅण्डही तयार केला होता. तर काहींनी दुचाकींचे बेकायदा पार्किंगही सुरू केले होते. याचा फटका रोजच वाहनचालकांना बसत होता.

वाहतूक विभागाची तत्परता
याची गंभीर दखल शिवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल चौधरी यांनी घेतली. त्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील तसेच ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे लेखी तक्रार करून भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. त्यानंतर वाहतूक विभागाने ही पोलीस चौकी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. ती आता द्वारका हॉटेलजवळील पुलाखाली नव्या जागेत बसवण्यात आली आहे.