बलात्कार पीडितेला ओळख पटवून देण्यासाठी शहरातल्या तमाम ‘सनीं’वर साडेसाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जितेंद्र मल्लाह, मुंबई

वांद्रे पूर्व येथील एका बलात्कार प्रकरणात सनी नावाच्या तरुणांचे सध्या चांगलेच धाबे दणाणले आहेत. बलात्कार पीडितेला आरोपीची ओळख पटवून देण्यात अपयश आल्याने फक्त नावावरून आरोपीचा शोध सुरू झाला आहे. पीडितेने सनी किंवा सन्नी असं नाव सांगितल्याने पोलीस आता सनी नावाच्या सगळ्या तरुणांची धरपकड करत आहेत. त्यामुळे वांद्र्यासह शहरभरात राहणाऱ्या सनींवर चौकशीरुपी साडेसाती ओढवली आहे.

ठाणे येथे राहणारी एक १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या प्रियकरापासून तिला दिवस गेल्याचं तिचं म्हणणं आहे. मात्र, अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सहा महिन्यांपूर्वी या मुलीचं कुटुंब वांद्रे पूर्वेला राहत होतं. त्या दरम्यान तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. मार्च महिन्यात या मुलीचं कुटुंब ठाण्याला स्थलांतरित झालं. त्यानंतर एक दिवस तिचं पोट दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्यावेळी ती गर्भवती असल्याची बाब उघड झाली.

या प्रकरणी पोलिसांनी मुलीला बाळाच्या पित्याचं नाव विचारलं. मात्र, पीडितेने तिला फक्त त्याचं नाव सनी किंवा सन्नी असल्याचं सांगितलं. त्याखेरीज त्याचा पत्ता किंवा उर्वरित ओळखीचे संदर्भ ती देऊ शकली नाही. त्यामुळे सनी किंवा सन्नी नावाच्या तरुणांना पकडून त्यांची ओळख पटवून देण्यापलिकडे पोलिसांकडे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पोलीस सनी किंवा सन्नी नावाच्या तरुणांना पकडून त्यांची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. पोलिसांच्या या धरपकडीमुळे वांद्र्यासह शहरातल्या आसपासच्या भागांमध्ये समान नावाच्या तरुणांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

summary- police cluelessly searching accuse named sunny