
सामना प्रतिनिधी, मुंबई
लाच स्वीकारल्याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता चौधरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायस्वाल यांनी चौधरी यांच्या बडतर्फीचे नुकतेच आदेश दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर पोलीस खात्यातून अधिकाऱयाला बडतर्फ केल्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गुप्तहेरांशी संबंध, बलात्कार आदी प्रकरणांत पोलिसांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते.
दत्ता चौधरी हे देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत होते. एका गुह्याचा तपास चौधरी यांच्याकडे होता. अटकपूर्व जामिनाकरिता एकजण सत्र न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्या गुह्यात चारजणांना अटक करू नका असे आदेश दिले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱयांनाही त्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यावर चौधरी यांनी नोटेड म्हणून स्वाक्षरी केली होती. तरीही चौधरी हे गुन्हा दाखल झालेल्याना रात्री उशिरा पोलीस ठाण्यात बोलावत होते. अटकपूर्व जामीन मिळवून देण्याकरिता तीन लाख रुपयांची लाच मागत होते.
लाचेचा पहिला हप्ता घेताना चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. सत्र न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनांचे पालन केले नसल्याने हे कृत्य गंभीर होते. त्यामुळे सुबोधकुमार जायस्वाल यांनी चौधरीना कारणे दाखवा नोटीस न बजावता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 (2) (बी) नुसार सेवेतून बडतर्फ केले.



























































