
अॅलोपॅथीला बिनकामाचे विज्ञान म्हणणाऱया योगगुरू रामदेव बाबांच्या विधानासंबंधी वाद चिघळला आहे. रामदेव बाबांविरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनने पोलिसांत तक्रार दाखल केली असून सफदरजंग हॉस्पिटल आणि ‘एम्स’मधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशन रामदेव बाबांवर महामारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिली आहे.
संपूर्ण देश सध्या महामारीविरुद्ध लढतो आहे. या संकट काळात रामदेव बाबांनी स्वतःच्या फायद्यासाठी वैद्यक शास्त्र आणि वैद्यकीय पेशावर हल्ला केला आहे, असा आरोप दिल्ली मेडिकल असोसिएशनने पोलिस तक्रारीतून केला आहे. दर्यागंज पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. एकतर अॅलोपॅथी रोखा, नाहीतर रामदेव बाबांवर महामारी कायद्याखाली गुन्हा दाखल करा, असे आव्हान आयएमएने केंद्राला दिले आहे. सफदरजंग हॉस्पिटल व एम्सच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने रामदेव बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. यादरम्यान पतंजली ट्रस्टने रामदेव बाबांविरोधातील आरोप चुकीचा आणि निरर्थक असल्याचे म्हटले आहे. रामदेव बाबांचा आधुनिक विज्ञान आणि आधुनिक चिकित्सा पद्धतीविरुद्ध कोणताही वाईट हेतू नसल्याचा खुलासा पतंजली योगपीठ ट्रस्टचे महासचिव आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे.





























































