
गेले अनेक दिवस वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या दादर कबुतरखान्याला सध्या पोलिसांचा भक्कम असा वेढा आहे. येथे दाणे टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. महापालिकेचे कर्मचारीही येथे गस्त घालून आहेत. येथे दाणे टाकणाऱ्याला शनिवारी पालिकेने पाचशे रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती आहे.
मुंबईत जेथे जेथे कबुतरांना दाणे टाकले जातात तेथे पालिकेने ठोस नियोजन करून यास प्रतिबंध करावे, असे स्पष्ट आदेश गेल्या महिन्यात न्यायालयाने दिले. नागरिक आपल्या घरातून कबुतरांना दाणे टाकत असतील त्यावर निर्बंध आणा, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले. या आदेशाचा सर्वाधिक परिणाम दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान्यावर झाला. कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई झाल्याने येथे तणाव निर्माण झाला.
पोलिसांना बळाचा वापर करून तणाव शांत करावा लागला. कबुतरखान्यांवर आम्ही बंदी घातलेली नाही. पण दाणे टाकण्यावर निर्बंध कायम राहतील, असे न्यायालयाने नंतर स्पष्ट केले. त्यामुळे दादर कबुतरखान्याला छावणीचे स्वरूप आले आहे. पालिकेचे अधिकारी येथे करडी नजर ठेवून आहेत. कबुतरांना दाणे टाकताना दिसल्यास त्याला पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जातो. असाच एकाला शनिवारी दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे.
कबुतरे कमी झालीत
कबुतरखान्यात दाणे टाकण्यास मनाई असल्याने येथे कबुतरांचे येणे कमी झाले आहे. रोजच्यापेक्षा कमी संख्येने कबुतरे येथे येत आहेत, असे येथील एका फेरीवाल्याने सांगितले.
नागरिकांनी सहकार्य करायला हवे
कबुतरांना दाणे टाकण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे आमचे काम आहे. याला नागरिकांनी सहकार्य करायला हवे, असे एका पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.