
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी शहरातील रमाबाई नगरात शेख सोहेल शेख पटेल (२०)या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्यां चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांनी कसुन तपास करुन ताब्यात घेतले. याचा चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला परभणी शहरातील रमाबाई आंबेडकरनगरात गंभीर घटना घडली होती. १७ रोजी रात्री १० वाजेदरम्यान दुचाकीवर हातात तलवारी व लोंखंडी रॉड घेऊन चार जणांनी याच नगरातील राहणारा युवक शेख सोहेल शेख पटेल याच्यावर जोरदार हल्ला केला. या प्रकरणातील आरोपी शेख हाजी शेख सलीम, शेख मोहमंद शेख अहेमद, शेख समी शेख समी आणि शेख शोहेब शे. तैमुर यांनी संगणमत करुन जीवे मारण्याच्या इराद्याने खूनी हल्ला केला. तसेच तलवारीने तरुणाचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हाताची बोटे कापून टाकली. अशा आशयाची तक्रार शेख मोहसीन मुजाहेद याने दिली. घटना घडल्यानंतर सर्वच्या सर्व आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.
परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे प्रवीण मोरे यांच्या पथकाने आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दळवी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अवघ्या सहा तासात चारही आरोपींना गजाआड करण्यात यशस्वी झाले. तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्ष सुनील गिरी यांनी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे






























































