
<<< प्रभाकर पवार >>>
[email protected]
गेल्या वर्षीच्या 30 एप्रिल रोजी देवेन भारती यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना निक्षून सांगितले होते की, “माझ्या कार्यकाळात मी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही,” “लाचखोरांनो, आपल्या कुटुंबीयांची तरी अब्रू राखा,” अशाही कानपिचक्या ते द्यायचे, परंतु पोलीस आयुक्तांच्या या पूर्व सूचनांचा बेशरम लाचखोरांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
गेल्याच आठवड्यात (18 फेब्रुवारी) कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव बळीराम तावडे व त्याच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोविंदराव जुन्ने हे एक लाख रुपयांची लाच घेताना कुरार पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले गेले. देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या वर्षभरात चंद्रकांत सरोदे (वडाळा टीटी), बाबूराव देशमुख (शिवाजी नगर) व आता संजीव तावडे (कुरार) असे तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. मुंबई पोलिसांच्या इतिहासात वर्षभरात रांगेत तीन वरिष्ठ निरीक्षक लाच घेताना पकडले जाण्याची ही पहिली वेळ आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांना याचा प्रचंड धक्का बसला. ते हताश झाले. ज्यांची लायकी नाही. पात्रता नाही अशा पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यांची सरदारकी बहाल करून देवेन भारती आता पस्तावले आहेत.
संजीव तावडे या निरीक्षकाबद्दल मुंबई पोलीस दलात फारसे कुणी निंदनीय बोलत नाही, परंतु संजीव तावडे यांनी ज्ञानेश्वर गोविंदराव जुन्ने या बदनाम फौजदाराला आपल्या जवळ करून स्वतःचा आत्मघात करून घेतला आहे. ज्ञानेश्वर जुन्ने हा याआधी गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होता. (फौजदार म्हणून एमपीएससीतर्फे निवड झाल्यावर) कुरार हे त्याचे दुसरे पोलीस ठाणे. “या नवख्या अधिकाऱ्याला, गुगली गोलंदाजाला लांब ठेवा. आपणास तो अडचणीत आणील, फसवेल,” असा सल्ला काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे यांना दिला होता, परंतु तावडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पुढील आयुष्याची माती केली. स्वतःच सुसाईड’ केले. ज्ञानेश्वर जुन्ने याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी होत्या. त्याच्या विरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात यापूर्वीही लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता, परंतु तो अयशस्वी ठरला. गेल्या आठवड्यात मात्र अॅण्टिकरप्शनवाले यशस्वी ठरले. ज्ञानेश्वर जुन्ने याच्या भागीदारीत सामील असलेल्या संजीव तावडे यांनाही बेड्या घालण्यात आल्या. संजीव तावडे यांचे हे पहिलेच पोलीस ठाणे
होते (वपोनि म्हणून).
आतापर्यंत जे जे वरिष्ठ निरीक्षक ट्रॅप झालेले आहेत ते त्यांच्या जवळपास असलेल्या व त्यांच्या नावाने वसुली करणाऱ्या फौजदारांमुळे पकडले गेले आहेत. बीट ऑफिसर, मिल स्पेशल, स्टेशन हाऊसचे फौजदार हे वरिष्ठ निरीक्षकांची दरमहा सेवा करतात, तर वरिष्ठ निरीक्षक झोनल डीसीपीची सेवा करतो. (जर डीसीपी भ्रष्ट असेल तर.) अलीकडे मुंबईच्या उत्तर परिक्षेत्राच्या एका उपायुक्ताच्या कार्यालयात खुलेआम पैसे मागितले जातात, त्या उपायुक्ताचा ‘रीडर’ कधी अॅण्टिकरप्शनच्या जाळ्यात सापडेल हे सांगता येणार नाही. वांद्रे बीकेसी येथे बसणाऱ्या उपायुक्ताचा एक ‘रीडर’ उपायुक्ताच्या कार्यालयातच काही वर्षापूर्वी ‘ट्रॅप’ झाला होता हे बहुधा हा रीडर विसरलेला दिसतो. असे उत्तर परिमंडळातील काही अधिकारी बोलत आहेत. तेव्हा पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी याची खात्री करावी व वरिष्ठांचे जे ‘कलेक्टर’ आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. कोणताही वरिष्ठ स्वतः शक्यतो कुणाकडे थेट पैशांची मागणी करीत नाही. त्याच्या अवतीभोवती असणारे अधिकारी-कर्मचारी मागणी करीत असतात. गाईच्या दुधाऐवजी गाईचे रक्त काढतात. रक्त काढल्यानंतर गाय लाथ मारणार नाहीतर काय?
कुरार पोलीस ठाण्याच्या फौजदाराविरुद्ध तक्रार करणारा एक वकील आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तीन लाखांची मागणी केली गेली होती. त्या वकिलाने दोन लाख रुपये फौजदार जुन्नेला दिले होते. परंतु जुन्ने आणखीन एक लाख रुपयासाठी वकिलाच्या मागे लागला तेव्हा त्याने अॅण्टिकरप्शनकडे धाव घेऊन वरिष्ठ निरीक्षक तावडे यांना सापळ्यात अडकवले.
लाच घेताना काही पोलीस पकडले जात असले तरी खाकी वर्दीतील बहुसंख्य पोलिसांकडे आजही आदराने पाहिले जाते. त्यांना मान दिला जातो. आयाबहिणींना पोलीस हा रक्षक वाटतो, परंतु अलीकडे खाकी वर्दीतील काही पोलीस रक्षक नव्हे, तर भक्षक झाले आहेत. खाकी वर्दी ही केवळ पोशाख नाही. ती कर्तव्य, शौर्य आणि विश्वासाचे प्रतीक आहे. सामान्य माणसाला पोलीस हा आधार वाटतो. पोलीस अनेकदा आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवतात, गुन्हेगारांना पकडतात, परंतु संजीव तावडे, ज्ञानेश्वर जुन्नेसारखे भ्रष्ट अधिकारी पोलिसांची व आपल्या कुटुंबीयांची अबू धुळीला मिळवतात. याला बेशरमपणाचा कळस म्हणायचे नाही तर काय? समाजाचा पोलिसांवर विश्वास आहे, तो टिकविणे ही काळाची गरज आहे. गेल्या वर्षभरात मुंबईसह महाराष्ट्रातून 150च्या वर पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले. पूर्वी पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक लाच घेताना अपवादात्मक पकडला जायचा, परंतु अलीकडे लाच स्वीकारण्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांची रांग लागलेली दिसते. महाराष्ट्र पोलिसांसाठी हे खचितच भूषणावह नाही. कालाय तस्मै नमः



























































