
>> प्रभाकर पवार, [email protected]
अडीच दशकांपूर्वी पब्लिक सेक्टर मधून (PSU’S) सेवानिवृत्त झालेली ८३ वर्षाची वृद्ध महिला दक्षिण मुंबईतील आपल्या घरात एकटीच राहते. तिच्या दोन विवाहित मुली परदेशात आपल्या कुटुंबासह आहेत. अलीकडेच या महिलेच्या पतीचे निधन झाले. त्या दुःखातून सावरत असतानाच सायबर माफियांनी तिला विळखा घातला. डिजिटल अटकेची भीती दाखवून तिला ७.७ कोटी रुपयांना फसविले. हा धक्का सहन न झाल्याने ती महिला अंथरुणाला खिळली आहे. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एकाकी वृद्धांची नियमितपणे त्यांच्या घरी जाऊन चौकशी करावी, त्यांच्या समस्या जाणून त्यांना मदत करावी, असे सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठांना आदेश आहेत. त्याप्रमाणे स्थानिक पोलीस वृद्धांची भेट घेतात. त्यांची विचारपूस करतात, परंतु बरेच ज्येष्ठ नागरिक पोलिसांसमोर आपले मन मोकळे करीत नाहीत. याचाच त्यांना मोठा फटका बसतो व भरून न येणारी क्षती पोहोचते.
दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात राहणाऱ्या वरील वृद्ध महिलेने पोलिसांना माहिती न दिल्यामुळे या महिलेची जबरदस्त आर्थिक हानी झाली आहे. ४ जुलैचा तो शुक्रवार होता. दुपारच्या वेळेस त्या महिलेच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने फोन उचलला व कानाला लावला असता समोरची व्यक्ती म्हणाली, “मी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कंपनीतून बोलत असून कुणीतरी आपल्या आधारकार्डाचा वापर करून आपल्या नावाने बँक खाते उघडले आहे. जेट एअरवेज कंपनीचे संचालक नरेश गोयल यांच्या बँक खात्यातील रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली आहे. तो मॅनी लॉण्डरिंगचा पैसा आहे. नरेश गोयल यांनी केलेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सीबीआय करीत असून आपल्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुणी ट्रायचा, कुणी सीबीआयचा, तर कुणी कुलाबा पोलीस ठाण्याचा अधिकारी असल्याचे भासवून (खाकी वर्दीत) व्हिडीओ कॉल केला व त्या महिलेला घाबरवून सोडले. आपल्या परदेशात राहणाऱ्या दोन मुलींना समन्स पाठवून मुंबईत बोलावून घेऊ अशीही त्या महिलेला धमकी दिली. “आम्ही तुला ‘डिजिटल’ अटक केली आहे. कुणाला फोन करायचा नाही. आम्ही सांगू तसेच करायचे.” असे बजावले व सुटका करण्यासाठी त्या महिलेकडून ७.७कोटी रुपये महिनाभरात उकळले. त्या महिलेने सायबर माफियांना पैसे देण्यासाठी आपल्याकडील शेअर्सही विकले. मुदत ठेवी (एफडी) मोडल्या. त्या महिलेकडील पैसे संपल्यानंतरही सायबर माफिया तिला रोज तीन-चार फोन करीत होते. शेवटी त्या महिलेने परदेशातील आपल्या मुलीना तिच्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगाची माहिती दिली. तेव्हा त्या मुलींना प्रचंड धक्का बसला. त्यांनी पोलिसांत गेल्या आठवड्यात तक्रार करण्यास सांगितले, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सारा पैसा परदेशात पळवला गेला होता. असे मुंबईसह आपल्या देशात रोज सुरू आहे.
गेल्या सहा महिन्यांत मुंबई शहरात २०० च्या वर नागरिकांना ६०० कोटी रुपयांच्या वर सायबर माफियांकडून फसविण्यात आले आहे. त्यात सेवानिवृत्त पेन्शनरांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना भुरट्या चोरांपासून ते सायबर माफियांपर्यंत कुणी फसवत नाही असे लफंगे शोधावे लागतील. घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यात कुणीही गळ्यातील. हातातील मौल्यवान वस्तू पळवून नेतात. घरात आल्यावर सायबर माफिया मोबाईलवरून छळतात. काही जण कुरियर बॉय असल्याचे भासवून घरात घुसतात. प्रतिकार केल्यावर जीवही घेतात. वर्तमानपत्रांत अशा बातम्या आपणास रोज वाचावयास मिळतात. सायबर माफिया ज्येष्ठ नागरिकांना फसवतात हे जरी खरे असले तरी डॉक्टर, वकील, इंजिनीअर आदी उच्चशिक्षितही चांगला परतावा मिळेल म्हणून सायबर माफियांच्या फसव्या शेअर बाजारात गुंतवणूक करून आपला कपाळमोक्ष करून घेत आहेत. पैशांचा मोह, दुसरे काय?
आपल्या देशात सत्ताधारी डिजिटल इंडियाचा डंका पिटतात, परंतु सिक्युरिटी काय आहे? मुंबईसारख्या शहरात सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर रोज सुमारे तीन हजार तक्रारी सायबर माफियांविरुद्ध असतात. मुंबई पोलीस दलात दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम व उत्तर असे पाच सायबर सेल आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातही सायबर अधिकारी आहेत, परंतु लोकांच्या तक्रारींचा ओघ बघता तक्रारदारांना न्याय देण्यात ते कमी पडतात. पोलीस ठाण्यात सायबर माफियांविरुद्ध तक्रार घेऊन गेलेल्या पीडितांना ते ‘फुटबॉल सारखे पळवितात, तेव्हा ‘गोल्डन अवर्स’ची वेळ निघून गेलेली असते. पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस ‘सायबर एक्सपर्ट’ असायला हवा. त्याला सायबर क्राईमचे ज्ञान हवे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यशाळा आयोजित करायला हव्यात. सायबर माफिया पोलिसांच्या दहा पावले पुढे आहेत. सायबर माफियांना बँक खाती, सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळ्या आज मुंबईत वावरत आहेत. काही जणांनी तर सिमकार्डची दुकानेच थाटली आहेत. मुंबई पोलिसांचा नावलौकिक संपल्यामुळेच चोर, लफंगे इतके धाडस खुलेआम करू लागले आहेत. मुंबई डिटेक्शन क्राईम बॅचचा एकेकाळी प्रचंड दरारा व लौकिक होता, आता तो संपला आहे. आता कुणीही किरकोळ लफंगा क्राईम बँचला आव्हान देतो. त्यामुळेच सायबर माफियांचा आतंक वाढला आहे.