
प्रभाकर पवार << [email protected] >>
कश्मीरमधील पुलवामा जिह्यात गुरुवार, 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेच्या आदिल अहमद या निमकहरामाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 कमांडोजचा (आरडीएक्सने भरलेल्या कारचा स्फोट घडवून) बळी घेतला तेव्हा हिंदुस्थानसह जगभरात त्याचे पडसाद उमटले. साऱ्यानीच संताप व शोक व्यक्त केला. सीआरपीएफ जवानांवर हल्ला करणारा फिदायीन असल्याचे उघड झाल्यावर कश्मीरमध्ये काही काळ जातीय तणाव निर्माण झाला. काही भागांत गालबोटही लागले, परंतु पोलिसांनी व लष्कराने काही तासांतच परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संभाव्य दंगल टाळली.
1992 साली अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर मुंबईसह देशभरात हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. मुंबई तर तब्बल एक महिना सतत जळत होती. 1992 च्या डिसेंबर महिन्यात हिंदूंचे प्रचंड नुकसान झाले, तर 1993 च्या जानेवारी महिन्यात मुस्लिम बांधवांचे अधिक नुकसान झाले. 1992-93 च्या जातीय दंगलीत 261 जणांचे बळी गेले, तर एक हजारच्या वर निरपराध व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कमालीची शांतता पसरली होती. परंतु 12 मार्च 1993 रोजी या शांततेचा भंग झाला. पाकिस्तानातून आलेल्या आरडीएक्सचा माहीम येथील स्मगलर टायगर मेमन याने मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून 257 जणांचे बळी घेतले तर 713 जणांना आयुष्यातून उठविले. या महासंहारक बॉम्बस्फोट मालिकांनंतर पुन्हा जातीय दंगल उसळविण्याचा व या देशाची अर्थवाहिनी असलेली मुंबई खाक करण्याचा पाकिस्तानच्या आयएसआयचा कट होता, परंतु तो फसला. जातीय दंगलीची झळ पोहोचलेल्या मुंबईकरांनी संयम राखला आणि पाकिस्तानचे मनसुबे उधळवून लावले. दंगली झाल्या नाहीत.
कश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयएसआय व जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेला तेच करायचे होते, परंतु आपल्या देशातील राष्ट्रप्रेमी हिंदू-मुस्लिमांनी पाकिस्तानचे इरादे नाकाम केले. तेव्हा आता साऱ्या देशवासीयांनी बेसावध राहून चालणार नाही. डोळय़ांत तेल घालून सतर्क राहण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानचे हस्तक मोहल्ल्या-मोहल्ल्यांत दबा धरून आहेत. बहकलेल्या मुस्लिम तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करून त्यांना जिहादचे धडे देत आहेत त्याच वेळी एकाकी….. Lone Wolf म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तरुणांना हुडकून त्यांना मुख्य प्रवाहात (Main Stream) आणायचे जटील काम सध्या महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत एटीएसने महाराष्ट्रातील सुमारे 200 मुस्लिम तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना नोकरीधंद्याला लावले आहे, त्यामुळे अलीकडे अतिरेक्यांच्या महाराष्ट्रातील अतिरेकी कारवाया थंडावल्या होत्या. परंतु कश्मीरमधील जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेच्या आदिल अहमद या जिहादीचा 40 जवानांवरील प्राणघातक हल्ला व उत्तर प्रदेशात जैश-ए-महम्मदच्या काही अतिरेक्यांची झालेली धरपकड पाहता जैश-ए-महम्मदने आपले जाळे देशभर पसरले असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. महत्त्वाच्या व्यक्तींचे अपहरण करून पकडलेल्या अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी होऊ शकते किंवा उठावही होऊ शकतो. त्यामुळे आता सर्वांनीच दक्ष राहणे आवश्यक आहे.
2006 सालातील मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट आठवला की आजही सामान्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. 2000 नंतर गँगवॉर आटोक्यात आल्यामुळे मुंबईत काहीशी शांतता पसरली होती, परंतु काही महिन्यांत इस्लामी अतिरेक्यांनी मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. स्थानिकांना हाताशी धरून पाकिस्तानी व कश्मिरी अतिरेकी मुंबईत आले होते. त्यातील पाच अतिरेक्यांना गोरेगाव व माटुंगा येथे मुंबई क्राइम बँचच्या अधिकाऱ्यांनी चकमकीत ठार मारले. तरीही जोगेश्वरीतील बेहरामबाग, ठाण्यातील मीरा रोड आदी भागांत आश्रयाला असलेले पाकिस्तानी अतिरेकी पळाले नाहीत. काही महिने मुंबई व ठाण्यात थांबल्यानंतर लश्कर-ए-तोयबाचे अतिरेकी पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी महाराष्ट्रातील मुंबई, विदर्भ, मराठवाडा आधी भागात शस्त्र्ाs वाटली व उठाव करण्याचा प्रयत्न सुरू केला. याची खबर नुकत्याच (2004 साली) स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यावेळी के. पी. रघुवंशी हे ‘एटीएस’चे (पहिले) प्रमुख होते. त्यांच्या पथकातील सुनील देशमुख, अरुण खानविलकर, वसंत ताजणे, दिनेश कदम, सचिन कदम, संजय खैरे, सुनील ब्रह्मे, दिनेश अहिर आदी पोलीस अधिकाऱ्यांनी 2006 च्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात संभाजीनगर, परभणी, मालेगाव, बीड आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धाडी घालून 42 किलो आरडीएक्स, 16 एके 56 रायफल्स, 50 हातबॉम्ब आदी शस्त्र्ा व स्फोटकांचा मोठा साठा जप्त करून विदर्भ व मराठवाडय़ातून दोन डझन अतिरेक्यांना अटक केली. पाकिस्तानातून आलेल्या या शस्त्र्ासाठय़ाचा वापर हिंदूंना ठार मारण्यासाठी करण्यात येणार होता, परंतु एटीएसने अतिरेक्यांचा हा उठाव हाणून पाडला. ‘‘पाकिस्तानी अतिरेक्यांच्या नांग्या ठेचल्या, कट उद्ध्वस्त केला,’’ अशा बातम्याही 2006 च्या जानेवारीत झळकल्या होत्या, परंतु केवळ सहा महिन्यांत इस्लामी अतिरेक्यांनी पुन्हा आपली नखे बाहेर काढली. 1993 च्या मुंबईतील महासंहारक बॉम्बस्फोट मालिकांची अतिरेक्यांनी पुन्हा आठवण करून दिली.
11 जुलैचा तो मंगळवार होता. चर्चगेटहून सुटलेल्या विरार व बोरिवली लोकलमध्ये अतिरेक्यांनी कुकरमध्ये (आरडीएक्सची) स्फोटके ठेवून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माटुंगा ते माहीम, वांद्रे ते खार, खार ते सांताक्रुझ, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड, मीरा रोड ते भाईंदर यादरम्यान 7 बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात 186 जण जागीच ठार झाले. त्यांच्या चिंधडय़ा उडाल्या तर 700 जण जखमी झाले. विरार व बोरिवली लोकलमधील फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये हे महासंहारक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यात कुणी इंजिनीयर, कुणी प्रोफेसर, कुणी शासकीय अधिकारी तर कुणी व्यापारी, उद्योजकही होते. अत्यंत cream public होते. 186 मृत रेल्वे प्रवाशांमध्ये 10 मुस्लिम प्रवासीही होते. हिंदूंना टार्गेट करणारे इस्लामी अतिरेकी निरपराध मुस्लिमांचेही बळी घेत होते. 11 जुलैच्या बॉम्बस्फोट मालिकेचा मीरा रोड येथील सूत्रधार फैजल शेख याच्यासह 13 आरोपींना मुंबई क्राइम ब्रँचने त्यावेळी अटक केली. त्यात क्राइम बँचचा गोवंडीचा खबऱ्या मोहम्मद अली याचाही समावेश होता. त्याच्याच घरी बॉम्ब बनवून लोकलमध्ये स्फोट घडविण्यात आले होते. त्यामुळे पुलवामा येथील हल्ल्यानंतर अतिरेकी शांत बसतील असे वाटत नाही. कधी रेल्वेचे डबे तर कधी कचऱ्याचे डबे तर कधी प्रवासी बसमध्ये बॉम्ब ठेवून, अफवा पसरवून देशवासीयांना भयभीत करण्याचे काम आता सुरू होईल. विमान अपहरणाचेही प्रयत्न होतील. तेव्हा नागरिकांनी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. पाकिस्तान हा विश्वासघातकी देश आहे. कश्मीरच्या प्रश्नावरून त्यांना आपला देश पेटवायचा आहे एवढे लक्षात ठेवा.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र एटीएसने संभाजीनगर, मुंब्रा आदी ठिकाणी धाड घालून एक डझन अतिरेक्यांना अटक केली. पाण्यात विष मिसळून त्यांना महाराष्ट्रात मोठी मनुष्यहानी करायची होती, परंतु एटीएसने त्यांच्या कृत्यांना लगाम लावला असतानाच पुलवामा येथे जवानांचा नरसंहार करण्यात आला. त्याचा सर्वत्र शोक सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंदच्या मदरशातून जैश-ए-मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांना शस्त्र्ासाठय़ासह अटक करण्यात आली. ‘26/11’ च्या मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेक्यांकडे कॉलेजची ओळखपत्रे सापडली होती. यूपीच्या मदरशातून पकडलेल्या आरोपींकडेही विद्यार्थी असल्याची आयकार्ड मिळाली आहेत. त्यामुळे पुढील काळ फार कठीण वाटत आहे. मोहल्ले काबीज केले जात आहेत. आपल्या देशातील शाळा-कॉलेजेही पोखरली आहेत. मदरसे, मशिदी, हज हाऊस आदी धर्मस्थळेही अतिरेक्यांची आश्रयस्थाने होऊ लागली आहेत. आता तर आपल्या देशाच्या हवाई दलाने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला व अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याने बॉम्बस्फोट मालिका नक्कीच वाढतील. तेव्हा जन हो सावधान… रात्र वैऱ्याची आहे!





























































