
>> प्रभाकर पवार, [email protected]
दक्षिण मुंबईच्या विठ्ठलभाई पटेल रोड (व्ही.पी. रोड) ठाण्याच्या दुर्गा मगन खर्डे या उपनिरीक्षक महिलेचा संयम ढळल्याने तिने आपल्या खाकी वर्दीवरील नावपट्टी (नेमप्लेट) तक्रारदारावर चक्क फेकून मारल्याचा एक व्हिडीओ १८ सप्टेंबरपासून व्हायरल झाला असून उपनिरीक्षक असलेल्या त्या महिलेच्या अशा वागणुकीबद्दल समाज माध्यमांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे, तर हेतुपुरस्सर मागच्यापुढच्या संभाषणाची, दृश्याची काटछाट करून पोलिसांना केवळ बदनाम करण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कर्ज वसूल करण्यासाठी कर्जदाराच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ करणाऱ्या तक्रारदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात जाब विचारायला गेलेल्या या तक्रारदाराने स्टेशन हाऊसला ड्युटीवर असलेल्या अधिकारी महिलेला तिचे नाव विचारले असता रागाच्या भरात त्या अधिकारी महिलेने आपल्या गणवेशावर असलेली नेमप्लेट त्या तरुणाच्या अंगावर फेकली. अशा या वादग्रस्त व्हिडीओने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दुर्गम अशा आदिवासी भागातून आलेल्या या उपनिरीक्षक महिलेला मुंबईकरांचा अनुभव नाही. काही लोक आपली तक्रार नोंदविण्यासाठी येतात तेव्हा ते डोक्यावर बसतात. स्वतःवर गुन्हा दाखल झालेल्या तरुणाने तेच केले. ड्युटी ऑफिसर असलेली ती महिला अन्य कुणाची तरी तक्रार नोंदवीत असताना आपली तक्रार नोंदविण्यासाठी त्या तरुणाने आग्रह धरला आणि वारंवार त्या महिलेला आपले नाव विचारले. तेव्हा संयम ढळलेल्या त्या तरुण अधिकारी महिलेने आपल्या वर्दीवरील नेमप्लेट काढली व त्या तक्रारदार तरुणाच्या दिशेने भिरकावली. तक्रारदार तरुणाने हे सारे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर व्हायरल केले. त्याचे तीव्र पडसाद उमटले.
मराठा आंदोलन संयमाने हाताळणाऱ्या मुंबई पोलिसांची सर्वत्र स्तुती सुरू असतानाच व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक महिलेचा तोल गेल्याने पुन्हा एकदा पोलिसांसाठी ‘समुपदेशन’ (Counselling) वर्ग सुरू करायची मागणी करण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या प्रत्येक पोलिसाने संयमाने वागले पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपली चिडचिड कोणत्या गोष्टीमुळे होते याचे निरीक्षण केले पाहिजे. कठीण प्रसंगी दीर्घ श्वास घेऊन शांतपणे विचार केला, चुकांमधून शिकले, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, इतरांच्याही भावनांचा विचार केला तर बरेच प्रश्न चुटकीसरशी सुटतात. आपल्यामध्ये दयाळूपणाही हवा आहे, परंतु बऱ्याच पोलिसांना आपल्या खाकी वर्दीची मिजास असते, माज असतो. एकेकाळी पोलिसांची खरोखर मिजास होती, परंतु आता सर्वसामान्य जनतेलाही आपले व पोलिसांचे अधिकार काय आहेत हे कळू लागल्याने पोलीस व तक्रारदारांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होताना दिसतात. संयम कसा असावा याचे एक उदाहरण आपणास खाली देत आहे. त्यापासून पोलिसांनी बोध घ्यायला हवा.
पाच वर्षांपूर्वीची ही घटना आहे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे वाहतुकीचे नियंत्रण करताना वाहतूक शाखेच्या एका ५४ वर्षीय पोलीस हवालदाराला एका तीस वर्षीय उन्मत्त महिलेकडून मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा बघणाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिडली. डोंगरी मस्जिद बंदर येथे राहणारी महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्कूटरवरून विनामास्क, विनाहेल्मेट प्रवास करीत असताना काळबादेवी डिव्हिजनच्या वाहतूक हवालदाराने तिला अडविले व दंड भरण्यास सांगितले, तेव्हा दंड भरणार नाही असे या उडाणटप्पू महिलेने त्या हवालदाराला सांगितले. त्यातून वाद झाला. भडक डोक्याच्या या महिलेने चक्क या हवालदारावर हल्ला केला. त्यांच्या वर्दीवर हात टाकला. शर्टची कॉलर पकडून त्यांना गरागरा फिरवले. त्यांच्या कानशिलात मारली. तरीही ते हवालदार काही बोलले नाहीत. तेव्हा ही महिला अधिकच चेकाळली. जमा झालेली पब्लिक पाहून ही निर्लज्ज, स्वैर महिला त्या हवालदाराला अधिकच मारहाण करू लागली. तरीही त्यांनी संयम सोडला नाही. शांतपणे त्या निर्दयी महिलेचा ते मार खात होते व जमाव हे सारं निर्लज्जपणे पाहत होता. काही जणांनी तर या रंगेल बाईच्या तमाशाचे व्हिडीओ शूटिंग करून ते व्हायरल केले. कोणीही त्या महिलेला अडविले नाही. अखेर जवळच्या पोलीस ठाण्यातील शिपाई महिलांनी धाव घेऊन त्या हवालदाराची सुटका केली.
सांगायचे तात्पर्य हे की, त्या हवालदाराने संयम राखला नसता, त्या महिलेवर हात उचलला असता, प्रतिकार केला असता तर त्या हवालदाराला जेलमध्ये जावे लागले असते. ट्रॅफीक हवालदारावर हात उचलणाऱ्या महिलेला, तिच्या प्रियकराला अटक झाली. ते दोघेही जेलमध्ये गेले. त्यामुळे ‘डिसिप्लिनरी’ फोर्स म्हणून ज्या खात्याची ख्याती आहे अशा शिस्तप्रिय दलातील दुर्गा मगन खर्डेसारख्या अधिकारी महिलांनी ‘सिंघम’ स्टाईल मारण्याचा प्रयत्न करू नये. ही मुंबई आहे. दुर्गा म्हणजे शक्तीचे प्रतीक, वाईट शक्तींचा नाश करणारी देवी याचे भान व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यातील या दुर्गेने ठेवावे. अंगात वर्दी आहे म्हणून कसेही तांडव करू नये.