पोलीस डायरी – तबलिगींचे आव्हान

प्रभाकर पवार

महाराष्ट्रात सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व त्यानंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या देशात ‘लॉक डाऊन’ची घोषणा केली. लोक घराबाहेर पडणार नाहीत, गर्दी टाळतील, नियम पाळतील अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. या देशातील 10 ते 15 टक्के बेशिस्त लोकांनी व मुसलमानांमधील तबलिगी समाजातील कट्टरपंथियांनी देशवासीयांना संकटाच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स व कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे पोलीसही भयभीत झाले आहेत.

घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स ठेवा, असे वारंवार सांगण्याचा, आवाहन करण्याचा प्रत्यक्ष व ध्वनिक्षेपकाद्वारे पोलिसांनी प्रयत्न केला. तरीही कुणीही ऐकेनात. तेव्हा रस्त्यावर येणाऱया व वाहनाने फिरणाऱयांना पोलिसांनी काठय़ा-लाठय़ांनी झोडून काढण्यास सुरुवात केली. त्यावर टीका झाल्याने पोलिसांनी रस्त्यावर येणाऱयांना माकडउडय़ा, उठाबशा काढायची शिक्षा देण्यास सुरुवात केली. तरीही त्याचा हवातसा परिणाम झाला नाही. (एखाद-दुसऱया खाकीतील अतिरेक्यांनी परिस्थिती समजून न घेता दीन-दुबळय़ांना नाहक मारहाण केली. त्या मारकुटय़ा पोलिसांची चौकशी करून त्यांना निलंबीतही करण्यात आले आहे हा अपवाद वगळता) त्यामुळे पोलिसांनी आता थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, मानवी जीवन धोक्यात आणणे, रोग पसरेल अशी घातक कृती करणे, अफवा पसरविणे आदी कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हय़ांची नोंद केली असून या गुन्हय़ात 1 महिन्याच्या कैदेपासून 3 वर्षांच्या कैदेपर्यंत (दाखल करण्यात येणाऱया गुन्हय़ांच्या अनुषंगाने) शिक्षा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच अटक होत नाही. पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्यावर पोलीस ठाण्यातच जामीन देतात. परंतु खटला सुरू झाल्यावर मात्र कायदे मोडणाऱयांची ‘पिवळी’ होते. कोर्ट-कचेऱयात पैसा खर्च होतो. हे टाळण्यासाठी स्वत:च्या व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी घरी थांबणेच आता हिताचे आहे. भारतीय दंड संहिता कायदा कलम 188, 270, 505 (2), 51 (ब), 52, 54, 2, 3, 4, 3, 6, 37 (3), 35 आदी कलमान्वये मुंबईसह महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात येत असून आतापर्यंत मुंबईत कायद्याचे उल्लंघन करणाऱया 2 हजार नागरिकांविरुद्ध, तर महाराष्ट्रात 5 हजारजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु गुन्हे दाखल करूनही लोक अद्याप वठणीवर आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुसलमानांमधील तबलिगी जमातीने तर साऱया देशवासीयांची झोप उडविली आहे. त्यांनी पसरविलेल्या कोरोनामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या (मरगज) सम्मेलनामध्ये जमलेल्या देश-विदेशातील प्रतिनिधींमुळे कोरोनाचा साऱया देशात प्रसार झाला. त्या साऱयांना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढले आणि त्यांना क्वारंटाइन केले आहे, तर काही थोडे फार तबलिगी आजही अंडरग्राऊंड आहेत, लपले आहेत. त्यांचा तपास सुरू असून यामागे काही विघ्नसंतोषी शक्तींची घातपाती योजना आहे का, याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणा शोध घेत आहे. परंतु ज्या तबलिगींचे विलगीकरण करण्यात आले आहे. ते तबलिगी डॉक्टर्स, नर्स व पोलिसांवरही दिल्लीत हल्ले करीत आहेत. त्यामुळे विलगीकरण करण्यात आलेल्या तबलिगींचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीत लष्कराच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दिल्लीत 94 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या तबलिगी समाजाच्या या देशात 140 शाखा असून ही जमात आपल्या जुन्या रुढी-परंपरांचेच पालन करते. त्यांना धर्मात होत असलेल्या सुधारणा मान्य नाहीत. अशा या संस्थेचा मौलाना साद हा प्रमुख असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मशिदीत आपल्या अनुययांसमोर भाषण करताना त्याने जे काही विष पेरले आहे ते पचण्यासारखे नाही. मी मागच्याच लेखात म्हटले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या देशात पुन्हा दंगली माजविण्याचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कट आहे. तरीही आपण आशा करूया की या देशातील कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस अबाधित ठेवतील. महाराष्ट्र ‘एटीएस’चे अधिकारी जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करणाऱयांचा अहोरात्र शोध घेत आहेत. तेव्हा सर्व धर्मीयांनी संयम ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या देशाची कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी हे पाकिस्तानचे स्वप्न आहे. त्याला कुणी खतपाणी घालू नये.

बेशिस्त लोकांचा बंदोबस्त करताना, कोरोनाबाधितांची सेवा करताना आमचे पोलीस मेटाकुटीस आले आहेत. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधीतांना विलग करीत आहेत. त्यातून आता त्यांनाही त्याची लागण व्हायला सुरुवात झाली असून मुंबईतील एका फौजरादांसह तीन पोलीस शिपाई पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका हवालदाराची तर पत्नी, तरुण मुलगा व मुलीवरही रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत. काही पोलीस तर डॉक्टर, नर्सेसप्रमाणे आता आपापल्या घरी जात नाहीत. गेले तर आपल्या मुलांबाळांचा संपर्क होऊ नये म्हणून रात्री उशिरा घरी जातात. काही पोलीस तर आपल्यापासून आपल्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत. पोलीस 24 तास तणावाखाली असतात. प्रत्येक घटनेत पोलिसांना पाचारण केले जाते. अशावेळेला तबलिगी जमातीमधील विकृत प्रवृतींविरुद्ध वातावरण गरम करून या देशाला स्वास्थ्य लाभणार नाही. त्यासाठी साऱया देशवासीयांनी संयम व शांतता राखली पाहिजे. खचलेल्या, मनोबल ढासळलेल्या पोलिसांना सूळावर चढवू नये. दंगलीला सामोरे जाण्याची त्यांची सध्या तरी मानसिकता नाही, इतके ते पिचले आहेत. आमचा साधा शिपाई व अधिकारी रोज उन्हातान्हात लोकांच्या शिव्या खात रस्त्यावर उभा असतो. तेव्हा आपले सारे हीरो पोलीस आहेत. चित्रपट तारे… क्रिकेटपटू नव्हेत. पोलीसच आपल्या मदतीला धावून येतात. तेच आपले खरे रक्षक आहेत याचे सर्वांनी भान ठेवावे व देशात जातीय सलोखा कसा राखता येईल, यासाठी सर्वधर्मीयांनी प्रयत्न केले पाहिजेत, पोलिसांना सहाय्य केले पाहिजे.

आज वर्षाचे 365 दिवस पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यांना मारहाण केली जात आहे. जातीधर्माच्या नावाखाली धर्मांध विकृतीचे पोलिसांना मोठे आव्हान उभे आहे. त्यासाठी आता सूज्ञ नागरिकांनी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. काही टनांच्या अणुबॉम्बने जे केले नसते ते आज एका 400 मायक्रोच्या सूक्ष्म विषाणूने आपल्या साऱयांची झोप उडविली आहे. यापासून लोकांनी आता तरी बोध घेतला पाहिजे. कसे जगायला पाहिजे हे आपणास एका महाविषारी कोरोनाने शिकविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या