
मीरा रोड पूर्वेच्या काशिमीरा येथील बहुचर्चित केम छो या डान्सबारवर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात 11 मुलींना ज्या छुप्या खोलीतून ताब्यात घेतले ती छुपी खोली एफआयआरमध्ये ‘लपवणारे’ अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांची आज उचलबांगडी करण्यात आली. त्यांना थेट वाहतूक शाखेत पाठवण्यात आले आहे. आयुक्त निकेत कौशिक यांनी केलेल्या या कारवाईमुळे मीरा-भाईंदर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला केम छो बार हा कायम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये या बारवर पोलिसांनी कारवाई केली. महापालिकेने हा बार जमीनदोस्त केला होता. तसेच एमआरटीपीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र धक्कादायक बाब अशी की अवघ्या काही महिन्यात बारमालकाने हा बार पुन्हा उभा केला.
छुप्या खोलीचा उल्लेख का टाळला?
या छाप्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जो एफआयआर तयार केला त्यात बारमालक आणि चालक फरार असल्याचे दाखवले, परंतु या बारवरील छाप्यात जी छुपी खोली सापडली तिचा उल्लेख मात्र एफआयआरमध्ये करण्यात आला नव्हता. ही बाब मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस ठाण्याचे आयुक्त निकेत कौशिक यांना कळताच त्यांनी या छुप्या खोलीचा उल्लेख का टाळला? अशी विचारणा करत कारवाईचा बडगा उगारला. अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांची आज या विभागातून उचलबांगडी करण्यात आली. त्यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.
36 जणांवर गुन्हे
गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने या बारवर पुन्हा छापा घातला. यावेळी स्टेजवर अश्लील अंगविक्षेप करत नाचणाऱ्या सात मुलींना ताब्यात घेतले, परंतु पोलिसांनी कसून तपासणी केली असता या बारच्या बाहेरच्या भिंतीच्या आत एक छुपी खोलीही (कॅव्हिटी) असल्याचे आढळले. या छुप्या खोलीतून 11 मुलींनादेखील ताब्यात घेण्यात आले. एकूण 18 मुलींसह 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.





























































