
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणत निरीक्षकाला विनयभंगाच्या तक्रारी अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी परभणीतील एका दांपत्याला अटक झाली आहे. जिंतुर शहरातील पोलीस ठाण्यात मुंजा थिटे व त्याची पत्नी सुचित्रा थिटे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, 18 एप्रिल रोजी नेहमी प्रमाणे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे काम करत बसलेले असताना शहरातील कसबा पेठ भागात राहणारे रफिक बशीर हे काही कामानिमित्त पोलीस स्थानकात दुपारच्या सुमारास आले होते. याच वेळी मुंजा थिटे व त्याची पत्नी सुचित्रा थिटे हे दोघे पोलीस स्थानकात आले. मुंजा थिटे याने मो रफिक यास जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना बशीर यांची फिर्याद घेऊ नका, तो आरोपी आहे. मी त्याच्या विरुद्ध फिर्याद देणार आहे, असे सांगायला सुरुवात केली. तसेच, मुस्लिमांच्या फिर्यादी घेतल्यास महाग पडेल अशी धमकी थिटे याने दिली.
थिटे तेवढ्यावरच थांबला नाही. तर पुढे, रफिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे अंमलदार मुळे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर दि 19 एप्रिल रोजी पुन्हा पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना फोन करून पुन्हा शिवीगाळ करत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
या बाबत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या तक्रारीवरून मुंजा थिटे व त्याची पत्नी सुचित्रा थिटे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी रविवारी संध्याकाळी उशिरा अटक केली आहे. मुंजा थिटे याच्यावर या पूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. जिंतूर कोटाने 23 एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































