हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतून हरवलेल्या तसेच अपहरण झालेल्या 18 वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान 10’ हाती घेतले आहे. जून महिन्यात हे ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. शहरात रोज कुठे ना कुठे लहान बालके हरवल्याचे तसेच अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल होत असतात. शिवाय ठिकठिकाणी बालके भीक मागताना तसेच मजुरी करताना दिसून येतात. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्यासाठी पोलीस जून महिन्यात शहरात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविणार आहेत. यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. जर कोणाला लहान बालके भीक मागताना, बाल मजुरी करताना किंवा बेवारसपणे फिरताना आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा 100 नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.