मुंब्य्रानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचा नंबर; पोलीस अधिकारी ऑनड्युटी क्वारंटाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ण मुंब्रा पोलीस ठाणे क्वारंटाईन झाल्यानंतर आता वर्तकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर विलगीकरणाची वेळ ओढावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार ढेपाळू नये यासाठी आता येथील पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःला ऑनड्युटी केबिनमध्ये क्वारंटाईन करून घेतले आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकासह 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांचाही समावेश आहे. त्यांचा सोमवारी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर वतर्कनगर पोलीस ठाण्याच्या सर्व 25 ते 30 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मंगळवारी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. मात्र, खबरदारी म्हणून येथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर येथील वरिष्ठांसह पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला केबिनमध्येच क्वारंटाईन करून घेतले आहे. वर्तकनगर परिसर कोरोनाच्या रेड झोनमध्ये असल्याने स्थानिक पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातच पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी क्वारंटाईन झाल्यामुळे पोलीस अधिकारी बंद केबिनमधून फोनवरूनच वर्तकनगर परिसरातील परिस्थिती हाताळत आहेत. याआधीच अख्खे मुंब्रा पोलीस ठाणेही क्वारंटाईन झाले आहे. त्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यावरही ही वेळ ओढावल्यामुळे 24 तास ऑनड्युटी असलेल्या ठाण्यातील पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

पोलिसांना धाकधूक
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मंगळवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. त्याआधीच 25 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र या सर्वांचे रिपोर्ट अजून आले नसल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे.