हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक निलंबित, तर पोलीस कर्मचारी  बडतर्फ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांना पूर्वसूचना न देता आजारी रजेची नोंद करून सुट्टीवर गेल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांना निलंबित करण्यात आले आहे. तर लाच स्वीकारताना पकडले गेलेले पोलीस नाईक नंदकुमार मस्के यांना बडतर्फ करण्याचे आदेश हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

हिंगोली तालुक्यातील माळसेलु येथील एका व्यक्तीच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढून देण्यासाठी व अतिक्रमण केलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी 25 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नंदकुमार उत्तमराव मस्के यांना रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली होती. हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज 25 मे रोजी एसीबीच्या अटकेतील पोलीस नाईक मस्के यांना हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावुन पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान,  याप्रकरणी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस नाईक नंदकुमार मस्के यांना बडतर्फ केले आहे.  तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्वाचा बंदोबस्त सुरू असताना आजारी रजेची नोंद करून सुट्टीवर गेल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाने काढल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या