पोलिसांनी वाचवले अल्पवयीन मुलाचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट लिहून घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाचे गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने प्राण वाचवले आहेत. तो मुलगा त्याच्या मित्राच्या घरी विरारला गेला होता. तेथून त्याला शोधून काढत साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले.

अल्पवयीन मुलगा हा साकीनाका परिसरात राहतो. त्याने कोविड काळात सॅनिटायझर आणि इतर वस्तूंचा व्यवसाय सुरू करतो असे सांगून काही जणांकडून मिळून 45 लाखांचे कर्ज घेतले होते. पैसे घेतल्यानंतर त्याने काही जणांना सॅनिटायझरचा पुरवठा केला नव्हता. लोकांकडून घेतलेल्या पैशांत तो मित्रांसोबत हिंदुस्थानातील विविध ठिकाणी फिरून आला. लोक पैसे मागू लागल्यावर त्याने बुधवारी इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट अपलोड केली. मोबाईल बंद करून तो घरातून निघून गेला.

या प्रकरणाचा समांतर तपास युनिट 10 करत होते. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक महेश ठाकूर यांच्या पथकातील सहायक निरीक्षक धनराज चौधरी, जगदीश धारगळकर, अविनाश चिकणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्या मुलाचा मोबाईल बंद होता. त्याचे प्राण वाचवणेही पोलिसांसाठी महत्त्वाचे होते. त्याचदरम्यान त्या मुलाच्या मित्राची पोलिसांना माहिती मिळाली. त्या मित्राला पोलिसांनी विश्वासात घेतले. विचारपूस सुरू असतानाच अल्पवयीन मुलाचा त्या मुलाला फोन आला. तो विरारमध्ये एका मित्राच्या घरी असल्याने त्याने त्या मुलाला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी माहिती काढून त्या मुलाला अखेर विरार येथून शोधून काढले.