
सामना ऑनलाईन, हाथरस
जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रकार देशभरात वाढत असतानाच उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये मृत म्हशींची वाहतूक करणाऱ्या चौघांना संतप्त जमावाने सुमारे तासभर चोपल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत चौघांची सुटका केली. बुधवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर पोलीस प्रशासन दक्ष झाले आहे. जमावाने चौघांवर म्हशी चोरीचा आरोप करीत त्यांना चोपल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत म्हशींची वाहतूक करणाऱ्या चौघांत दोघे हिंदू आणि दोन मुस्लिम तरुण आहेत. या चौघांनी आपल्याकडे मृत जनावरे वाहण्याचा परवाना असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांना चोपणारे गावकरी मात्र या चौघांनी चोरीच्या ऊद्देशाने म्हशीवर विषप्रयोग केल्याचा आरोप करीत होते. जमावाकडून चौघांना मारहाण करत असताना एका गावकऱ्याने या घटनेचे व्हिडीओ शूटिंगही केले. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणखीनच खळबळ उडाली. घटनास्थळापासून पोलीस स्टेशन ५० किमी अंतरावर असल्याने पोलीस वेळेत तेथे आले आणि चौघांचे प्राण वाचले. पोलिसांनी याप्रकरणी म्हशीच्या मालकांशीही संपर्क साधला असून गावकरी दोषी आढळले तर त्यांनाही शिक्षा होईल असे पोलीस अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले.


























































