
सामना प्रतिनिधी । पारध
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात शुक्रवारी मासरूळ (ता.जि. बुलढाणा) येथील स्वप्नील श्रीरंग भुते (वय 24) या तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह जंगलात फेकल्याची घटना घडली होती. पोलिसांनी पाच दिवस बुलढाणा, चिखली, धामणगाव, मासरूळ आदी परिसर आरोपींना पकडण्यासाठी पिंजून काढला. मात्र आरोपी सापडत नव्हते. अखेर पोलीसांनी मंगळवारी स्वप्नीलचे काही मित्र आणि नातेवाईकांची कसून चौकशी केली. त्यात प्रेम प्रकरणातून कुमार अनुप सोनुने आणि करण शळके (दोघे रा.बुलढाणा)यांनी स्वप्नील भुते याचा खून केल्याचे पोलिसांनी समजले आणि या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
पारध पोलीसांनी बुधवारी पहाटे कुमारला संभाजीनगर येथून तर करण याभला बुलढाणा येथून ताब्यात घेऊन पारध पोलीस ठाण्यात हजर केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पारध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पाच दिवसातच आरोपींना अटक करून या प्रकरणाचा उलगडा केला आहे. स्वप्नील भुते याच्या भावकीतील एक मुलगी बुलढाणा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे कुमार सोनवणे या तरुणाशी प्रेम संबंध जुळले. ही बाब स्वप्नीलला कळल्याने त्याने कुमारला समज दिली. मात्र, कुमारने वेळ मारून नेली. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. नंतर मात्र स्वप्नील याने मुलीला सांगितले की, तू कुमारसोबत प्रेमसंबंध ठेवले तर आपली समाजात बदनामी होईल. आपण वारकरी संप्रदायाचे आहोत. त्यामुळे तू असे करू नको, असे तिला समजावले. ही गोष्ट मुलीने कुमारला सांगितली. आता स्वप्नील ही गोष्ट माझ्या घरी सांगेल. त्यामुळे मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही असे तिने कुमारला सांगितले. त्यामुळे कुमार संतापला आणि त्याने करण शेळकेच्या मदतीने शुक्रवारी स्वप्नीलला त्याच्या शेतातून भरदुपारी पारध परिसरात आणून लाकडी फळी आणि दगडाने ठेचून त्याचा खून केला होता.
भोकरदनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाय, पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे,रामेश्वर सिनकर,गणेश पायघन, समाधान तेलंग्रे,प्रकाश सिनकर,दिनेश पायघन, किशोर मोरे,कल्पना बोडखे,शिवाजी जाधव यांच्या पथकाने कसू शोध घेत पाच दिवसात खून प्रकरणाचा उलगडा केला आहे.