
संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शांततेच्या मार्गाने मराठी भाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावमध्ये दाखल होत असताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कानडी पोलिसांनी रोखल्याने सीमाभागासह महाराष्ट्रातही संताप व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी कानडी पोलिसांना हुलकावणी देत यड्रावकर एकटेच बेळगावमध्ये दाखल झाले होते.
आज सकाळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे जयसिंगपूर येथून बेळगावला हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निघाले होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर प्रचंड फौजफाटय़ात कानडी पोलिसांनी त्यांना बेळगावात जाण्यास अटकाव केला.
महाराष्ट्रातील कोणीही बेळगावला अभिवादनास येऊ नये, यासाठी कालपासूनच कोगनोळी टोल नाक्यावर कानडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहनांचीही कडक तपासणी सुरू होती. यड्रावकर यांना टोल नाक्यावर रोखल्यानंतर येथे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ टोल नाक्यावरच कर्नाटक पोलिसांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.
हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही
बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषक गावे जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने लोकशाहीचा गळा कितीही घोटला, तरी महाराष्ट्र सरकार कायम सीमाबांधवासोबतच राहील, असे आश्वासन देत हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.



























































