
सीबीआयचा (केंद्रीय अन्वेषण विभाग) अधिकारी असल्याचे सांगत एकाच्या घरी छापा टाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. संतोष भगवान साळुंखे असे बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्याचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी त्याच्या बडतर्फीचे आदेश दिले आहेत.
साळुंखे 2013 मध्ये बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) नेमणुकीला होता. त्यावेळी त्याची नेमणूक पोलीस आयुक्त कार्यालयातील गेट क्रमांक तीन येथे होती. मात्र, तो गुलटेकडी येथील एकाच्या निवासस्थानी गेला. सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली. निवासस्थानी हवाला रॅकेट चालत असल्याचे सांगत त्याने छापा टाकण्याचा बनाव केला. त्यावेळी तक्रारदार यांनी साळुंखेला ओळखपत्र आणि वॉरंटची विचारणा केली. त्यावेळी त्याने दुरूनच ओळखपत्र दाखविले होते. याप्रकरणी साळुंखेला निलंबित केले होते. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी केली. साळुंखेला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. चौकशीत त्याच्यावर ठेवलेले आरोप सिध्द झाले. साळुंखेने पदाचा दुरूपयोग करून लाभासाठी बेजाबादारपणे वागून गुन्हेगारी कृत्य केल्याचे चौकशीत दिसून आले आहे. त्याच्यामुळे खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे, असा ठपका ठेवत त्याला पोलिस खात्यामधून काढून टाकण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.



























































